देशभरात करोना संसर्गाचा जोर अजूनही कायम असून, दररोज साडेतीन ते चार लाख रुग्णांची भर पडत आहे. रुग्णसंख्येच्या विस्फोटामुळे आरोग्य सुविधा कोलमडताना दिसत असून, वेळेत उपचार न मिळाल्याने, त्याचबरोबर ऑक्सिजन वा इतर सुविधांअभावी रुग्णांचे प्राण जात आहे. त्यामुळे अनेकजण सरकारवर निशाणा साधत आहेत. दरम्यान छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये जेठालाल हे पात्र साकारणारे दिलीप जोशी यांनी सरकारला दोष देण्यापेक्षा लॉकडाउनच्या नियमांचे पालन करा असे आवाहन लोकांना केले आहे.

दिलीप जोशी यांनी लोकांना लॉकडाउनचे नियम, सोशल डिस्टंसिंगचे पालन आणि जेथे जास्त लोकं जमा होतील तेथे जाऊ नका असे आवाहन केले आहे. तसेच सर्वांनी मास्क लावणे गरजेचे आहे, कामा शिवाय घराबाहेर पडून नका असे देखील त्यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा : ‘शर्म है या बेच दी’, बोल्ड ड्रेस परिधान करुन डान्स केल्यामुळे रश्मी देसाई झाली ट्रोल

दिलीप जोशी म्हणाले, ‘लॉकडाउन संपल्यानंतर आज आपण जशी काळजी घेत आहोत तशीच घेत रहायला हवी. लोकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये किंवा काही झालेच नाही असे वागू नये.’

पुढे ते म्हणाले, ‘केवळ सरकारला दोष देण्याऐवजी लोकांनी जबाबदारीने वागायला हवे आणि सहकार्य केले पाहिजे. आपण सर्व सावध राहिलो नाही, सुचनांचे पालन केले नाही तर ही साथ कधीही संपणार नाही. आपण सर्वांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे आवश्यक आहे, मास्क लावावे आणि लवकरात लवकर लस घ्यायला हवी.’

सध्या अनेक मालिकांचे महाराष्ट्राबाहेर चित्रीकरण सुरु आहे. पण ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेचे चित्रीकरण थांबवण्यात आले आहे. या विषयी बोलताना दिलीप जोशी म्हणाले, ‘काम तर होतच राहिल पण लोकांचे जीवन महत्त्वाचे आहे. जे प्रोडक्शन हाऊसेस इतर शहरांमध्ये चित्रीकरण करत आहेत त्यांनी काळजी घ्यायला हवी. माझा देवावर विश्वास आहे. प्रत्येकजण घरी आहे, सध्या कुटुंबापेक्षा काही महत्वाचे नाही’ असे त्यांनी म्हटले आहे.