डिजीटल प्लॅटफॉर्मवरील प्रेक्षक गेल्या काही महिन्यांपासून ज्या वेब सीरिजची आतुरतेने वाट पाहात होते, ती सीरिज येत्या १५ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गणेश गायतोंडे, सरताज सिंग, काटेकर अशा गाजलेल्या भूमिकांची वेब सीरिज ‘सेक्रेड गेम्स’चा दुसरा सिझन लवकरच नेटफ्लिक्सवर येणार आहे. त्यापूर्वी या बहुप्रतिक्षित सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला. पहिला सिझन पाहताना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं या सिझनमध्ये मिळण्याची शक्यता तर आहेच शिवाय या सिझनचं आणि ‘गली बॉय’चं एक खास कनेक्शनसुद्धा आहे. हा गली बॉय म्हणजे झोया अख्तरच्या चित्रपटातील रणवीर सिंग नाही तर रणवीरने ज्या रॅपरची भूमिका साकारली, तो खराखुरा ‘गली बॉय’.

‘सेक्रेड गेम्स २’चा ट्रेलर तुम्ही पाहिला असेल तर त्यात बॅकग्राऊंडमध्ये ‘काम २५’ हे गाणं ऐकू येतं. हे गाणं आहे ‘गली बॉय’ रॅपर डिव्हाइनचं. व्हिव्हियन फर्नांडिस जो रॅपर ‘डिव्हाइन’ म्हणून प्रसिद्ध आहे, त्यानेच ‘नेटफ्लिक्स’वरील ‘सेक्रेड गेम्स 2’साठी ‘काम २५’ हे रॅप लिहिलं आहे. राजकारण, गुन्हेगारी, मुंबई अशा गोष्टी डोक्यात ठेवून त्याने हे गाणं लिहिल्याचं तो सांगतो.

‘या सीरिजमधील सर्वच कलाकारांचा मी चाहता आहे. याचे दिग्दर्शक सुद्धा मला खूप आवडतात. त्यामुळे त्यांच्याकडून आलेली ऑफर मी नाकारणं शक्यच नव्हतं. या गाण्यात मी मुंबई या शहराविषयी चांगल्या आणि वाईट गोष्टीसुद्धा लिहिल्या आहेत. काहीही झालं तरी, हे शहर माझं घर आहे आणि या शहरापासूनच मी सर्वकाही शिकलो आहे,’ असं डिव्हाइन म्हणाला.

रॅपर डिव्हाइन व नॅझी या दोघांच्या जोडीवर झोया अख्तरचा ‘गली बॉय’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामुळे ‘रॅप’ ही संकल्पना नव्याने प्रेक्षकांना समजली.