News Flash

उत्तुंग व्यक्तिमत्त्वावर ‘प्रकाश’झोत

गेल्या काही काळापासून सातत्याने प्रेक्षकांसमोर चरित्रपट येत आहेत. काल्पनिक पात्रांपेक्षा खरेखुऱ्या माणसांमध्ये, त्यांच्या संघर्षमय जीवनामध्ये अधिक नाटय़ असते.

| October 12, 2014 06:23 am

गेल्या काही काळापासून सातत्याने प्रेक्षकांसमोर चरित्रपट येत आहेत. काल्पनिक पात्रांपेक्षा खरेखुऱ्या माणसांमध्ये, त्यांच्या संघर्षमय जीवनामध्ये अधिक नाटय़ असते. ते चित्रबद्ध करण्याचा प्रयत्न मराठी-हिंदी चित्रपटांमध्ये केला जात आहे. ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे द रिअल हिरो’ या चित्रपटाच्या माध्यमातूनही डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी मंदाताई आमटे यांनी केलेले कार्य आणि त्यांचे जीवन यावर प्रकाशझोत टाकण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे. परंतु, परिपूर्ण चित्रपट बनविण्यात दिग्दर्शिका अपयशी ठरली आहे. rv03प्रमुख कलावंतांच्या समर्थ अभिनयामुळे चित्रपट विशिष्ट उंचीवर पोहोचला असला तरी त्याचे श्रेय कलावंतांच्या अभिनयकौशल्याला द्यावे लागेल, दिग्दर्शिकेला देता येणार नाही.
गडचिरोली जिल्ह्य़ातील दुर्गम भागात असलेल्या हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प उभा करून तेथील माडिया गोंड आदिवासी लोकांची सेवा करण्याचे व्रत २० वर्षांहून अधिक काळ करणारे डॉ. प्रकाश आमटे आणि मंदाताई आमटे या उत्तुंग व्यक्तिमत्त्वांचे पैलू चित्रपटातून उलगडून दाखविण्याचे शिवधनुष्य दिग्दर्शिकेने उचलायचे ठरविले, या विषय निवडीबद्दल त्यांचे कौतुक केलेच पाहिजे. परंतु, चरित्रपटासाठी अतिशय आवश्यक असलेली उत्तम संहिता, पटकथेच्या अभावामुळे वास्तवातील उत्तुंग, नि:स्वार्थी, व्रतस्थ आणि खऱ्याखुऱ्या नायकाच्या आयुष्यातील संघर्ष, त्यावर त्यांनी केलेली मात याचे दर्शन अतिशय कमी प्रसंगांतून प्रेक्षकाला घडते. त्यामुळे चित्रपट प्रेरक ठरत असला तरी व्यक्तिमत्त्वाचा उत्तुंगपणा मनाला भिडत नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे विस्कळीत पटकथा आणि मांडणी हे आहे. एक मात्र नमूद करणे आवश्यक आहे ते म्हणजे या चित्रपटामुळे डॉ. प्रकाश आणि मंदाताई आमटे यांचे कार्य मोठय़ा संख्येने प्रेक्षकांना माहीत झाले आहे.
डॉ. प्रकाश आणि मंदाताई आमटे यांचा खडतर प्रवास, त्यांना मिळालेले मॅगसेसे पारितोषिक, उभयतांचे प्राणिप्रेम, निरलस, अव्याहत प्रयत्नवादाचे वडिलांकडून मिळालेले बाळकडू निराश न होता आयुष्यभर व्रतस्थपणे जीवन जगणे याचे दर्शन निश्चितपणे नाना पाटेकर आणि सोनाली कुलकर्णी यांनी आपल्या अभिनयकौशल्याद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचविले आहे. लोकबिरादरी प्रकल्पाला भेट देण्यासाठी तीन-चार परदेशी पाहुणे हेमलकसामध्ये येतात, त्यांना वाटेत नक्षलवादी लोक अडवतात या प्रसंगाने चित्रपटाची सुरुवात होते. नंतर डॉ. प्रकाश व मंदाताई आमटे अमेरिकेला भेट देतात, तिथे केवळ त्यांच्यामुळे ज्या आदिवासी तरुणाचे आयुष्य बदलले तो अचानक येऊन भेटतो असे प्रसंग आले आहेत. मध्येच डॉ. प्रकाश आमटे यांच्या तोंडी स्वगत आणि मागे वळून पाहतानाचा प्रवास उलगडत जातो. प्रसंगांची संगती अनेकदा प्रेक्षकाला लावता येत नाही. लग्नानंतर हेमलकसा येथे जाण्याचे आधीपासूनच डॉ. प्रकाश व मंदाताई आमटे यांचे ठरलेले असते. त्यानुसार अतिशय दुर्गम असलेल्या हेमलकसा भागात ते येतात. शून्यापासून सुरुवात करून माडिया गोंड आदिवासींना आपलेसे करतात, त्यांची सेवा करतात, त्यांचे जीवन उजळून टाकतात, त्यांचे अलौकिक प्राणिप्रेम, पशूंवरही पोटच्या मुलासारखं प्रेम करण्याची वृत्ती यांसारख्या काही गोष्टी बहुसंख्य मराठी प्रेक्षकांना पुस्तकांमुळे, मुलाखतींमुळे माहीत आहेत. परंतु, त्यापलीकडे जाऊन डॉ. प्रकाश-मंदाताई आमटे यांना लोकबिरादरी प्रकल्प उभा करण्यासाठी करावा लागलेला जीवतोड संघर्ष, तेथील आदिवासींची भाषा शिकण्यापासून ते प्रकल्पात मदतीसाठी लागणारी माणसं जोडणं हे सगळं त्यांनी कसं केलं असेल, त्यासाठी त्यांना बळ कसं मिळालं असेल या गोष्टी दिग्दर्शिकेला दाखविता आलेल्या नाहीत. डॉ. प्रकाश आमटे यांचा जगण्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन, कितीही कष्ट पडले तरी प्रयत्न करीत राहण्याची वृत्ती याचे दर्शन मात्र मोजक्या संवादांतून उलगडण्यात दिग्दर्शिका यशस्वी ठरली आहे. विषयनिवडीबद्दल दिग्दर्शिकेचे अभिनंदन करतानाच विषयाचा आवाका पेलता आलेला नाही हेही नमूद केले पाहिजे.
नाना पाटेकर यांनी डॉ. प्रकाश आमटे आणि सोनाली कुलकर्णी यांनी मंदाताई आमटे या भूमिका समर्थपणे साकार केल्या आहेत. एम्पलवार, जगन व अन्य प्रकल्पात मदत करणाऱ्या व्यक्तींशी डॉ. आमटे दाम्पत्याचे असलेले नाते कुठेच उलगडून दाखविलेले नाही.
एस्सेल व्हिजन, झी टॉकीज प्रस्तुत
डॉ. प्रकाश बाबा आमटे द रिअल हिरो
निर्माती-दिग्दर्शन – समृद्धी पोरे
कथा-पटकथा-संवाद – समृद्धी पोरे
छायालेखन – महेश अणे
कला दिग्दर्शन – अभिषेक रेडकर
संगीत – राहुल रानडे
कलावंत – नाना पाटेकर, सोनाली कुलकर्णी, डॉ. मोहन आगाशे, तेजश्री प्रधान, पुष्पा आगाशे व अन्य.
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2014 6:23 am

Web Title: dr prakash baba amte the real hero
टॅग : Bollywood
Next Stories
1 इरसाल जुगलबंदी
2 शाहरूख आणि करीना ‘हमसफर’..
3 अखेरीस हृतिक वरमला!
Just Now!
X