रमाबाई म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग. बाबासाहेबांचं उच्च शिक्षण असो, सत्याग्रह असो वा आंदोलनं रमाबाई बाबासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि त्यांनी आपलं कुटुंबही सांभाळलं. महापुरुषाची सहचारणी होण्याचं व्रत रमाबाईंनी मोठ्या निष्ठेने आणि प्रेमाने पाळलं. बाबासाहेबांसोबत सावलीसारख्या राहिलेल्या रमाबाईंना त्यांच्या तब्येतीने मात्र साथ दिली नाही आणि त्यांचं निधन झालं. बाबासाहेबांच्या आयुष्यातली ही अतिशय धक्कादायक आणि हादरवून सोडणारी घटना. बाबासाहेबांनी आपल्या खूप जवळच्या व्यक्तींना याआधीच गमावलं होतं. त्यामुळे रमाबाईंच्या जाण्याने महामानवाला आणखी एका दु:खद घटनेला सामोरं जावं लागलं. बाबासाहेबांच्या आयुष्यातलं हे भावनिक वळण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेतही पाहायला मिळणार आहे.

अभिनेत्री शिवानी रांगोळेने रमाबाईंची भूमिका साकारली. ही भूमिका शिवानीने फक्त साकारली नाही तर ती मालिकेच्या निमित्ताने रमाबाईंचं आयुष्यच जगली. रमाबाईंच्या निधनाने तिची देखिल मालिकेतून एक्झिट होणार आहे. शिवानीसाठी ही एक्झिट नक्कीच हुरहुर लावणारी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेतल्या या भावनिक वळणाविषयी सांगताना शिवानीही भावूक झाली होती. “अतिशय भावनिक वातावरणात हा सीन शूट झाला. सेटवर प्रत्येकालाच अश्रू अनावर होत होते. रमाबाईंच्या या भूमिकेने मला खूप काही दिलं आहे. आयुष्यभर ही भूमिका माझ्या स्मरणात राहील. आयुष्यात अशा संधी खूप कमी वेळा मिळतात की जेव्हा एखादं पात्र तुम्हाला अंतर्बाह्य बदलून टाकतं. रमाबाई ह्या भूमिकेसाठी मला दशमी क्रिएशन्सकडून फोन आला तेव्हा इतर काहीही विचार करायच्या आधी मी भारावून गेले होते. मी जेव्हापासून काम करायला सुरुवात केली तेव्हा पासून एखादी सशक्त, महत्वकांक्षी स्त्री व्यक्तिरेखा, जिला ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व असेल, अशी करण्याची खूप इच्छा होती. लूक टेस्टला मला रमाबाई या आंबेडकरांवर रुसल्या आहेत पण त्यांचा रोष लपवत, त्या खोटं हसून बोलत आहेत असा प्रसंग दिला होता. माझ्याकडे वाक्य नव्हती, संदर्भ नव्हता, पण मी पहिल्यांदा नववारी साडी नेसून, कपाळावर लाल कुंकू लावून जेव्हा पाय मुडपून जमिनीवर बसले आणि शेजारी खुद्द आंबेडकर आहेत असा भाव मनात ठेवून बोलू लागले तेव्हा माझी देहबोली आपोआप बदलली. मला सुरुवातीला अगदी चालण्या पासून ते पदराआड हसण्याची सवय लावेपर्यंत सगळ्या गोष्टी हळूहळू शिकाव्या लागल्या. मला या भूमिकेच्या निमित्ताने रमाबाईंच्या आयुष्यावरील अनेक पुस्तकं वाचता आली. यातलं मला आवडलेलं पुस्तकं म्हणे योगीराज बागुल यांचं प्रिय रामू. यात एक फार सुंदर प्रसंग लिहिलेला आहे. रमाबाईंनी आयुष्यभर जितक्या सहजपणे श्वास घ्यावा तितक्या सहजपणे सेवाभाव जपला ,कष्ट सोसले. छोट्याशा खोलीत अनेक माणसांचा संसार सांभाळल्यानंतर एक दिवस आंबेडकर त्यांना एका टुमदार बंगल्यासमोर घेऊन येतात आणि सांगतात की, हा बंगला आजपासून रमाबाई आंबेडकर यांचा आहे. तेव्हा रमाबाईंच्या तोंडून बाहेर पडलेलं पहिलं वाक्य होतं , केवढं मोठं घर आहे. माणसं नसतील तर ओकंबोकं वाटेल. मला वाटतं या अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून रमाबाईंनी खूप काही शिकवलं. ताटात गरजेपेक्षा जास्त वाढून घ्यायचं नाही आणि शेजारी दुसऱ्याचं रिकामं ताट असेल तर आपला तोंडचा घास त्याला द्यायचा हे वयाच्या १०-१२ व्या वर्षीच अंगी भिनलं होतं.”

prakash ambedkar caa nrc against hindus
“हिंदुंना भाजपच फसवतेय”, ॲड. प्रकाश आंबेडकर यांची टीका; म्हणाले, “सीएए आणि एनआरसी कायदा मुस्लिमांच्या नव्हे…”
Narendra Modi death threat
“जगभरात मोदींच्या हत्येचा कट”, भाजपाच्या नेत्याचं खळबळजनक विधान; म्हणाले, “मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर…”
Prakash Ambedkar Vijay Wadettiwar
“आम्ही कपडे फाडण्यात एक्सपर्ट, त्यामुळे तुम्ही वंचितच्या…”, प्रकाश आंबेडकरांचा विजय वडेट्टीवारांना इशारा
prakash ambedkar
“चळवळीला लाचार करून…”, प्रकाश आंबेडकरांचा मविआला टोला; म्हणाले, “माझ्या आजोबांनी…”

“रमाबाई साकारायला मिळणं ही एक खूप मोठी जबाबदारी होती. धाकधूक मनात असली तरी. हा प्रवास मला सतत मिळणाऱ्या लोकांच्या प्रेमामुळे, त्यांचं आपल्याकडे लक्ष आहे ह्या जाणीवेतून सुखकर झाला. लोकांनी मला रमाई म्हणणं ही माझ्यासाठी एक पदवीच आहे. त्याबद्दल मी नेहमी ऋणी असेन,” अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या.