‘सिरियल किसर’ असलेल्या इमरान हाश्मीची नवी ओळख आता ‘आयटम गर्ल्स’बरोबर ‘छम्मा छम्मा’ करणारा नायक अशी होणार आहे. आगामी ‘उंगली’या हिंदी चित्रपटात इमरान हाश्मी आठ ‘आयटम गर्ल्स’सोबत नाचणार आहे.
बॉलिवूडच्या चित्रपटात हॉट चुंबन दृश्याबरोबरच आता ‘आयटम सॉंग’ही आवश्यक झाले आहे. बॉलिवूडमध्ये सुरुवातीला आयटम सांॅग म्हणजे नायिकांची मक्तेदारी होती. पण आमिर खान, अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, अभिषेक बच्चन, सलमान खान, शाहरुख खान, ऋतिक रोशन यांनी अशा प्रकारची गाणी केली आहेत. आता या नायकांच्या पंक्तीत इमरान हाश्मी याचाही समावेश होणार आहे. करण जोहरच्या ‘उंगली’ या आगामी चित्रपटात इमरान हाश्मी हा ‘आयटम सॉंग’वर नाचताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
या आयटम सॉंगचे चित्रीकरण झाले असून या गाण्यात इमरान हाश्मी बरोबर एक, दोन नव्हे तर चक्क आठ आयटम गर्ल्स सहभागी झाल्या असल्याचे सांगण्यात येते. गाण्यात सहभागी झालेल्या या सर्व मॉडेल विदेशी असून करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या या चित्रपटातील हे आयटम सॉंग ‘बोल्ड’ असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये आहे.
इमरानवर चित्रीत झालेली गाणी लोकप्रिय ठरली असून ‘उंगली’ या चित्रपटातील हे आयटम सॉंगही लोकप्रिय होईल, असा विश्वास इमरानला वाटत आहे. या चित्रपटात इमरानसह संजय दत्त, कंगना राणावत, नेहा धुपिया आदी कलाकार आहेत. हा चित्रपट २८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार असून बॉलिवूडबरोबरच प्रेक्षकांचेही लक्ष या आयटम सॉंगकडे लागले आहे.