News Flash

जेमतेम करमणूक

प्रासंगिक विनोदी प्रसंग असले तरी मूळ चित्रपटाच्या तुलनेत प्रेक्षकांची हसवणूक फारशी होत नाही.

| September 6, 2015 02:07 am

अलीकडे हिंदी चित्रपटांचे सीक्वेल पाहिले की मूळ चित्रपटच बरा होता, किमान हसवणूक करणारा तरी होता असे म्हणण्याची वेळ प्रेक्षकांवर येते. ‘वेलकम बॅक’ या चित्रपटाचेही असेच झाले आहे. मूळ चित्रपटातील वॉण्टेड भाईची फिरोझ खानने साकारलेली भूमिका या चित्रपटात नासिरुद्दीन शहाने साकारली असून त्याच्या तोंडी अधूनमधून ‘मजाक था भाई’ असे संवाद टाकून दिग्दर्शकाने हसविण्याचा प्रयत्न केला आहे. प्रासंगिक विनोदी प्रसंग असले तरी मूळ चित्रपटाच्या तुलनेत प्रेक्षकांची हसवणूक फारशी होत नाही. त्यामुळे वॉण्टेडभाईच्या संवादाप्रमाणेच हा चित्रपट म्हणजे ‘मजाक था भाई’ असे म्हणण्याची वेळ प्रेक्षकांवर येते.सीक्वेल आला की मूळ चित्रपटाशी त्याची तुलना होणे हे स्वाभाविक असते. मूळ चित्रपट ‘पैसा वसूल’ ठरल्याने आठ वर्षांनंतर सीक्वेल काढणे हेही स्वाभाविक असले तरी लेखक-दिग्दर्शकांना धमाल करता आलेली नाही. त्यामुळे आठ वर्षांनंतरही हा चित्रपट पाहताना प्रेक्षकांना पहिल्या चित्रपटातील अक्षय कुमार, फिरोझ खान, कतरिना, मल्लिका शेरावत यांची आठवण येणे हेही स्वाभाविकच म्हणायला हवे.अक्षय कुमारने साकारलेली भूमिका या चित्रपटात जॉन अब्राहमने साकारली आहे, परंतु विनोदाचा बाज आणि जॉन अब्राहमकडे नसलेली किमान अभिनयक्षमता यामुळे त्याची भूमिका सतत खटकते. या सीक्वेलमध्ये सुरुवातीपासून शेवटापर्यंत मोठमोठे परदेशात उभारलेले सेट, वॉण्टेडभाई, मजनू-शेट्टीभाई आणि डॉ. घुंगरू यांच्या श्रीमंतीचे दर्शन, झकपक गाडय़ा, प्रत्येक भाईबरोबर असतो तसा पंटरांचा लवाजमा आणि त्यांना घेऊन असलेल्या प्रसंगांमधील बालिश विनोदाची पखरण यावरच लेखक-दिग्दर्शकांनी भर दिला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना हसविण्याचा ओढूनताणून प्रयत्न चित्रपट करतो. डिम्पल कपाडिया, अंकिता श्रीवास्तव यांची भरजरी वेशभूषा असली तरी कोणताही प्रभाव या दोघी जणी प्रेक्षकांवर पाडू शकत नाही. तकलादू कथानक, विनोदी प्रसंगांची भट्टी न जमल्यामुळे ‘मजाक है भाई’ असेच चित्रपटाबाबत म्हणावे लागते.मध्यांतरानंतर कबरस्तानातील एका प्रसंगात राजपाल यादव, अनिल कपूर, नाना पाटेकर, जॉन अब्राहम आणि डॉ. घुंगरूच्या भूमिकेतील परेश रावल यांनी त्यातल्या त्यात धमाल करून हसविण्याचा प्रयत्न केला आहे इतकेच. मात्र बाकी अखंड चित्रपट निखळ करमणूक करण्यात अपयशी ठरतो आणि जेमतेम करमणुकीवरच प्रेक्षकांना समाधान मानावे लागते. अर्थात जॉन अब्राहम, अनिल कपूर, नाना पाटेकर यांच्या चाहत्यांना आपल्या लाडक्या कलावंतांना रुपेरी पडद्यावर पाहणे समाधान देऊ शकेल असे मानायला हरकत नाही.

वेलकम बॅक
निर्माता
– फिरोज नाडियादवाला

दिग्दर्शक – अनीस बाझमी

पटकथा – अनीस बाझमी, राजीव कौल, राजन अग्रवाल, प्रफुल पारेख

संवाद – राज शांडिल्य

संगीत – आदेश श्रीवास्तव

कलावंत – अनिल कपूर, परेश रावल, जॉन अब्राहम, नाना पाटेकर, नासिरुद्दीन शहा, श्रुती हसन, डिम्पल कपाडिया, अंकिता श्रीवास्तव, शायनी आहुजा, ब्रह्मानंदम, साक्षी मग्गू, अदि इराणी, मुश्ताक खान, साक्षी मग्गू, संभावना सेठ, सुप्रिया कर्णिक, सुवरिन चावला, लॉरेन गॉटिलिब, रिमा देबनाथ.

 

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2015 2:07 am

Web Title: enough comedy
Next Stories
1 शैलीच्या धुक्यात हरवलेलं ‘सुसाट’
2 लेखकालाही प्रसिद्धी आणि पैसा मिळायला हवा
3 आशा भोसलेंच्या चाहत्यांसाठी ‘पर्वणी’
Just Now!
X