‘पानिपत’च्या ऐतिहासिक लढाईवर दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर ‘पानिपत : द ग्रेट बेट्रेयल’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून १७६१ साली अहमद शाह अब्दाली व मराठे यांच्यात झालेल्या युद्धावर चित्रपटाची कथा आधारित आहे. मात्र आता या चित्रपटावरून अफगाणिस्तानमध्ये वाद रंगला आहे. अफगाणिस्तानच्या काही सोशल मीडिया युजर्सनी भारतीय निर्मात्यांना व प्रशासनाला अब्दालीची नकारात्मक भूमिका न दाखवण्याची मागणी केली आहे.

अफगाणिस्तानात अब्दालीला आदराने ‘अहमद शाह बाबा’ म्हटलं जातं. त्यामुळे चित्रपटात त्यांचं नकारात्मक पात्र रंगवू नये अशी अफगाणिस्तानच्या सोशल मीडिया युजर्सची मागणी होत आहे. ‘पानिपत’मध्ये अभिनेता संजय दत्त अहमद शाह अब्दालीची भूमिका साकारत आहे. ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वी संजयने त्याचा लूक सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यावर कमेंट करत भारतातील अफगाणिस्तानचे राजदूत शाइदा अब्दाली यांनी ट्विट केलं, ”भारत-अफगाणिस्तानदरम्यान संबंध मजबूत करण्यासाठी भारतीय चित्रपटांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. मला आशा आहे की, ‘पानिपत’ चित्रपटाने या दोन्ही देशांच्या सामायिक इतिहासाची ही गोष्ट लक्षात ठेवली असेल.”

आणखी वाचा : राणा डग्गुबतीला डेट करतेय ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री?

मुंबईतील अफगाणिस्तानचे वाणिज्य दूतावास अधिकारी नसीम शरीफी यांनीही यासंबंधी ट्विट केलं आहे. “अहमद शाह बाबा यांचा कुठल्याही प्रकारे अपमान होणार नाही यासाठी गेल्या दीड वर्षांपासून भारतातील अफगाणी प्रयत्नशील आहेत. अहमद शाह बाबा यांची भूमिका खराब असती तर ती मी स्वीकारलीच नसती, असं संजय दत्त यांनी मला सांगितलं आहे.”

संजय दत्त, अर्जुन कपूर, क्रिती सनॉन यांची मुख्य भूमिका असलेला ‘पानिपत’ येत्या ६ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.