अतुल मांजरेकर दिग्दर्शित फन्ने खान या चित्रपटात दैनंदिन आयुष्यातील निरर्थक शर्यतीतून बाहेर पडून जग जिंकायला निघालेल्या वडील-मुलीची कथा मांडण्यात आली आहे. या चित्रपटामध्ये बॉलिवूडमधील तगडी स्टारकास्ट झळकली असून या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअर प्रसारित होणार आहे.
या चित्रपटात अनिल कपूर, ऐश्वर्या राय, राजकुमार राव, दिव्या दत्ता आणि पिहू संद अशा नामवंत कलावंतांची फौज आहे. या व्यक्तिरेखांनी आयुष्यभर बाळगलेल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी चाळ आणि गगनचुंबी इमारतींच्या परस्परविरोधी जगांचा एकमेकांशी झालेला सामना हा चित्रपट मांडतो. हिंदी चित्रपट वाहिनी सोनी मॅक्सवर १८ जानेवारी (शुक्रवारी) रात्री ९ वाजता हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

चित्रपटाची कथा वडील आणि त्यांच्या स्थूल मुलीच्या आयुष्याभोवती फिरताना दाखविण्यात आली आहे. प्रशांत कुमार हा १९९०च्या दशकातील ऑर्केस्ट्रा गायक फन्ने खान (अनिल कपूर) या नावाने ओळखला जातो. तो मोहम्मद रफींचा चाहता आहे. अर्थात, तो कधीही संगीतविश्वात काही करू शकत नाही. त्याला मुलगी होते तेव्हा तो तिचे नाव गायिका लता मंगेशकर यांच्यावरून ‘लता’ असे ठेवतो आणि तिला मोठी गायिका करायचे असे मनाशी ठरवतो.

अनेक वर्षांनंतर लता गायिका होण्याचा प्रयत्न करते पण तिचे वजन तिच्या आड येते. प्रशांत सध्या एका छोट्या कारखान्यात काम करत असतो. तो कारखाना बंद पडतो. प्रशांतला वाटते की, त्याचे लताला गायिका बनवण्याचे स्वप्न आता मोडणार. लवकरच, तो गुपचूप ड्रायव्हिंग सुरू करतो. बेबी सिंग नावाची प्रसिद्ध गायिका जेव्हा त्याच्या टॅक्सीत बसते, तेव्हा तो तिचे अपहरण करतो आणि तिला त्याच्या कारखान्यात घेऊन जातो. तिथे त्याचा मित्र अदिर त्याला मदत करतो. ते दोघेही बेबीचा मॅनेजर करण कक्कडला फोन करतात आणि खंडणी मागतात. लवकरच कथा उलगडते आणि त्यांची आयुष्ये वेगळ्याच वळणाला लागतात.