पंजाबमध्ये शेतकऱ्यांच्या एका गटाने अभिनेत्री जान्हवी कपूरच्या ‘गुड लक जेरी’ चित्रपटाचे चित्रीकरण रोखून धरले होते. या आठवडयाच्या सुरुवातीला ही घटना घडली. सोमवारी आंदोलकांचा एक गट शूटिंगच्या स्थळी पोहोचला व चित्रीकरणात व्यत्यय आणला.

जान्हवी कपूरने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ वक्तव्य करावे, अशी त्यांची मागणी होती. चित्रपटाच्या क्रू कडून आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलक शेतकऱ्यांनी तिथून काढता पाय घेतला. त्यानंतर जान्हवी कपूरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेतकऱ्यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले.

नेमकं काय प्रकरण आहे?
बास्सी पाथना शहरात ‘गुड लक जेरी’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे. सोमवारी शेतकऱ्यांचा एक गट तिथे जमला होता. कृषी कायद्यांविरोधात जे आंदोलन सुरु आहे, त्यावर अभिनेत्रीने तिचे मत मांडावे अशी त्यांची मागणी होती. चित्रपटाच्या क्रू ने आंदोलनाला समर्थन देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलक शेतकऱ्यांनी तिथून काढता पाय घेतला. सिद्धार्थ सेनगुप्ता ‘गुड लक जेरी’ चित्रपटाचे चित्रीकरण करत आहेत.आनंद एल राय या चित्रपटाचे निर्माते आहेत.

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ बॉलिवूड कलाकारांनी काहीही कमेंट केलेली नाही, असे आंदोलकांनी चित्रपटाचा क्रू आणि दिग्दर्शकाला सांगितले. जान्हवी कपूर यावर काहीतरी बोलेल असे त्यांना आश्वासन मिळाल्यानंतर ते माघारी फिरले.