PUBG हा भारतातील सर्वाधिक लोकप्रिय गेम्सपैकी एक म्हणून ओळखला जातो. देशातील जवळपास १० कोटी युझर्स पब्जी गेम खेळतात. मात्र या लोकप्रिय विदेशी गेमला टक्कर देण्यासाठी आता एक देसी गेम लवकरच भारतीय गेमर्सच्या भेटीला येत आहे. ‘फौजी’ (FAU-G) असं या गेमचं नाव आहे. या चर्चेत असलेल्या फौजी गेमचा टीझर नुकताच लॉन्च करण्यात आला. हा टीझर सध्या सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. दरम्यान या गेमवर काही गंमतीशीर मिम्स देखील व्हायरल होत आहेत.

अभिनेता अक्षय कुमारने या नव्या कोऱ्या गेम्सचा टीझर ट्विट केला आहे. अक्षयने ट्विट केलेल्या या व्हिडीओमध्ये गलवान खोऱ्याचं दृष्य दिसत आहे. या खोऱ्यात भारत विरुद्ध चीन युद्ध सुरु आहे. भारतीय सैनिक चिनी सैनिकांवर हल्ला करताना दिसत आहेत. शिवाय भारताचा झेंडा देखील डौलाने फडकताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. फैजी हा गेम काही प्रमाणात पब्जीसारखाच आहे. परंतु निर्मात्यांनी भारतीय सैनिकांना केंद्रस्थानी ठेवून या गेमची निर्मिती केली आहे. त्यामुळे या गेममधून मिळणाऱ्या एकूण नफ्यापैकी २० टक्के नफा भारतीय आर्मीला देण्यात येईल. या गेमचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.