८ नोव्हेंबर २०१६ला रात्री १२ वाजल्यापासून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा व्यवहारातून रद्द होतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आणि त्यानंतर सर्वत्र एकच गोंधळ उडाला. मोदी सरकारच्या या निर्णयाचे काहीजणांनी समर्थन केले. तर, अनेकांनी याविषयी नाराजीचा सूर आळवल्याचे पाहायला मिळाले.

नरेंद्र मोदींच्या या तडकाफडकी निर्णयामुळे सर्वसामान्यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे गेले काही दिवस पाहायला मिळत आहे. पण पंतप्रधानांच्या या निर्णयाचा फटका अनेक क्षेत्रांना बसल्याचेही पाहायला मिळत आहे. चित्रीकरण झालेल्या आणि प्रदर्शित होण्यासाठी उभ्या ठाकलेल्या काही चित्रपटांसमोर चांगलेच अडथळे निर्माण झाले आहेत. चित्रपटसृष्टीमध्येही काही चित्रपटांचे चित्रीकरण तुर्तास थांबविण्यात आले आहे. या चित्रपटांमधीलच एक म्हणजे अभिनेता अजय देवगणचा आगामी चित्रपट ‘बादशाहो’.

अजयच्या या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होण्यापूर्वीच काही दिवसांसाठी बंद करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजय देवगण, इम्रान हाश्मी, ईशा गुप्ता, विद्युत जामवाल आणि इलियाना डिक्रूज यांच्या भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलन लुथरिया करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १९ नोव्हेंबरपासून या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होणार होती. चित्रीकरणासाठीची सर्व तयारीही झाली होती. पण, ५०० आणि १०००च्या नोटांवर आलेल्या बंदीमुळे एकच गोंधळ उडाला आणि या चित्रपटाचे चित्रीकरण तुर्तास थांबविण्यात आले. येत्या काही दिवसांमध्ये सर्वकाही पूर्वपदावर येताच या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या तारखांमध्ये अचानक बदल करुनही अजय देवगण आणि चित्रपटाची इतर स्टारकास्ट निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना पूर्ण सहकार्य करत असल्याची माहिती मिळाली आहे.

काही छोटेखानी कलाकार, चित्रपटाच्या सेटवर काम करणारे मजूर, सामानाची ने-आण करणारी कामगार मंडळी यांना त्यांच्या कामाचा मोबदला दर दिवशी रोख स्वरुपात दिला जातो. सरकारच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयामुळे या कामगारांना त्यांच्या कामाचा मोबदला देण्यासाठी समोर येणाऱ्या अडचणी लक्षात घेत या चित्रटाच्या चित्रीकरणाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

दरम्यान, मोदी सरकारचा हा मोठा निर्णय मानला जातो आहे. या निर्णयाचे अतिशय दूरगामी परिणाम होणार आहेत असेही म्हटले जातेय. काळा पैसा हा मोदी सरकारच्या अजेंड्यावरील विषय होता. आता देशातील काळ्या पैशाची सफाई करत मोदींनी एका वेगळ्या स्वच्छ भारत मोहिमेला सुरुवात केली आहे असेच अनेकांचे म्हणणे आहे.