चित्रपटगृहबंदी लांबण्याच्या धास्तीने निर्मात्यांची उत्पन्नवाट

रेश्मा राईकवार, लोकसत्ता

मुंबई : टाळेबंदीचा वाढत असलेला कालावधी आणि करोनाच्या धोक्यामुळे पुढील काही महिने चित्रपटगृहे सुरू होण्याबाबत असलेली अनिश्चितता यामुळे चित्रपट निर्मात्यांनी आता उत्पन्नासाठी आपले तयार चित्रपट इंटरनेटद्वारा चालणाऱ्या ‘ओटीटी’ (ओव्हर द टॉप) वाहिन्यांच्या दारात उभे करण्यास सुरुवात केली आहे. निर्माते ‘ओटीटी’ हक्कांच्या विक्रीतून आपल्या निर्मितीखर्चाची भरपाई करू पहात आहेत. तर, मोठमोठय़ा कलाकारांच्या भूमिका असलेल्या अशा चित्रपटांच्या ‘प्रीमियम’ प्रदर्शनातून प्रेक्षकसंख्या वाढण्याची ओटीटी कंपन्यांना आस आहे.

नवाझुद्दीन सिद्दिकीचा ‘घुमके तू’ हा चित्रपट शुक्रवारी ‘झी ५’वर प्रदर्शित झाला. पाठोपाठ शुजित सरकार  दिग्दर्शित ‘गुलाबो सिटाबो’ हा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राईमवर १२ जूनला प्रदर्शित होणार आहे. याखेरीज आणखीही काही चित्रपट येत्या काही महिन्यांत चित्रपटगृहांऐवजी थेट ओटीटीवरून प्रदर्शित होणार आहेत. टाळेबंदीबाबतची अनिश्चितता आणि करोनाच्या भीतीने चित्रपटगृहांतील प्रेक्षक रोडावण्याची भीती यांचा अंदाज घेऊन निर्माते चित्रपटांचे प्रदर्शन हक्क ओटीटी कंपन्यांना विकून आपला संभाव्य तोटा कमी करू पाहात आहेत.

सध्या सर्वसामान्य बजेट असलेल्या चित्रपटांचीच ही प्रदर्शन घाई दिसून येत आहे. एकीकडे ओटीटी हक्कांच्या विक्रीतून या चित्रपटांच्या निर्मितीखर्चाची थोडीफार भरपाई होते तर दुसरीकडे, चित्रपटगृहांत प्रदर्शनासाठी करावा लागणारा वितरण आणि प्रसिद्धी खर्चही वाचत असल्याने निर्माते हा पर्याय स्वीकारत आहेत. अवाढव्य खर्च करून चित्रपटनिर्मिती करण्यात प्रसिद्ध असलेल्या व्यावसायिकांनी मात्र स्पष्ट शब्दांत थेट ओटीटी प्रदर्शनाला नकार दिला आहे.

चित्रपटगृहात प्रदर्शित न झालेल्या सिनेमांचे हक्क विकत घेण्यासाठी ओटीटी कंपन्याही चांगली रक्कम मोजत आहेत. येत्या काळात अमिताभ बच्चन, आयुषमान खुराणा, नवाजुद्दिन सिद्दिकी, विद्या बालन यांसारख्या कलाकारांची भूमिका असलेल्या या चित्रपटांच्या ओढीने अधिकाधिक प्रेक्षक आपल्या ओटीटी वाहिनीचे सदस्यत्व स्वीकारतील, असा या कंपन्यांचा होरा आहे.

हे चित्रपट रांगेत

‘शकुं तला देवी – ह्युमन कॉम्प्युटर’, अनुराग बासूचा ‘ल्युडो’, अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘चोक्ड’, ‘लक्ष्मी बॉम्ब’, ‘शेरशाह’, ‘इंदु  की जवानी’, ‘खाली पिली’, ‘गुंजन सक्सेना – कारगिल गर्ल’, ‘रुही अफझाना’, ‘चेहरे’ हे चित्रपटही ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे.

अ‍ॅमेझॉन प्राईमवर काही दाक्षिणात्य चित्रपटही थेट प्रदर्शित होणार आहेत.

ओटीटीकडे ओघ

’ टी सीरीज कं पनीने यावर्षी त्यांच्या बॅनरखाली निर्मिती होत असलेल्या सगळ्याच चित्रपटांच्या ओटीटी प्रदर्शनासाठी नेटफ्लिक्सबरोबर बोलणी सुरू के ली आहेत.

’‘लक्ष्मी बॉम्ब’ किं वा ‘गुंजन सक्सेना’ या चित्रपटांची निर्मिती फॉक्स स्टार, झी स्टुडिओसारख्या निर्मितीसंस्थांची आहे. त्यांचे स्वत:चे ओटीटी प्लॅटफॉम्र्स असल्याने हा निर्णय अवघड नसल्याचे ट्रेड विश्लेषकांचे म्हणणे आहे.

ओटीटी कं पन्या दरवर्षी चित्रपटांसाठी खूप मोठय़ा रकमेची गुंतवणूक करतात. त्यामुळे चांगले कलाकार आणि सर्वसाधारण बजेटचे चित्रपट घेणे त्यांना सहजशक्य आहे. दरवर्षी १५ चित्रपट घेत असतील तर यावर्षी ते सहाच दर्जेदार चित्रपट प्रदर्शित करतील. निर्मात्यांनाही चित्रपटगृहात प्रदर्शनासाठी काही कोटी खर्च करावे लागतात, त्यातून सूट मिळेल आणि नफाही कमावता येईल. त्यामुळे चित्रपटगृहे पूर्वपदावर येईपर्यंत हे समीकरण निर्मात्यांना फायदेशीर ठरणार आहे.  – अतुल मोहन, चित्रपट व्यवसाय विश्लेषक