दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या मुलीला बलात्काराची धमकी देणाऱ्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीत मोदींच्या विजयानंतर अनुरागच्या मुलीला ट्विटरवरून एका मोदी समर्थकाने बलात्काराची धमकी दिली होती. अत्यंत अश्लील भाषेत त्या व्यक्तीने ट्विट केलं होतं. मोदींचा टॅग करत अनुरागने त्या ट्विटचा स्क्रीनशॉर्ट शेअर केला होता. माझ्या मुलीला धमकावणाऱ्या तुमच्या समर्थकांना कशाप्रकारे तोंड द्यायचं हे सुद्धा आम्हाला सांगा असा टोला त्याने मोदींना लगावला होता. आता याप्रकरणी धमकावणाऱ्या व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल झाला आहे.

एफआयआर दाखल झाल्यानंतर अनुरागने पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. ‘मी मुंबई पोलीस, महाराष्ट्र सायबर आणि ब्रजेश सिंह यांचे एफआयआर दाखल करण्यासाठी मदत केल्याबद्दल आभार. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी सर यांचेही आभार मानू इच्छितो. एक पिता म्हणून मला आता अधिक सुरक्षित वाटू लागले आहे,’ असे ट्वीट अनुरागने केले आहे.

वाचा : हो, हारणाऱ्यांचाच मी प्रचार केला- स्वरा भास्कर 

पंतप्रधान मोदींना उद्देशून ट्विट केल्यानंतर काही कलाकारांनी अनुरागचा विरोधसुद्धा केला. ‘धमकीविरोधात तू पोलिसांकडे गेलं पाहिजे, पंतप्रधानांकडे नाही,’ असं काहींनी म्हटलं. या आधी अनुरागने अनेकदा मोदींवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. मात्र वैचारिक मतभेदासाठी मुलीला अशाप्रकारे धमक्या येत असल्याबद्दल अनुरागने ट्विटवरुन चिंता व्यक्त केली होती.