चित्रपट अधिक प्रभावी बनवण्यासाठी निर्माते आणि दिग्दर्शक काय काय शक्कल लढवतील याचा नेम इतक्या सहजासहजी लावता येत नाही हेच खरे. त्यातही एखाद्या चित्रपटाच्या पाठीशी भक्कम निर्माते असले की चित्रपटाच्या निर्मितीवरही अमाप खर्च केला जातो याची अनेक उदाहरणे चित्रपटसृष्टीमध्ये पाहायला मिळत आहेत. कोणताही चित्रपट कोणत्या कारणामुळे चर्चेत येईल हे सांगता येत नाही. एखादा चित्रपट त्यातील कलाकारांमुळे नावाजला जातो, एखादा चित्रपट त्यातील बोल्ड दृश्यांमुळे चर्चेत येतो, तर एखाद्या चित्रपटाला त्यातील कलाकारांच्या पोशाखामुळे चर्चेत येण्याचा वाव मिळतो. असेच काहीसे एका दाक्षिणात्य चित्रपटासोबत घडलेले पाहायला मिळत आहे.

तेलगु चित्रपटांमध्ये अभिनेता नागार्जुनचा आगामी ‘ओम नमो नमो व्यंकटेशाय’ हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटातील अभिनेत्री प्रज्ञा जैसवालने नुकताच तिचा फर्स्ट लूक प्रसिद्ध केला. या फर्स्ट लूकमध्ये प्रज्ञा एका सुरेख असा लेहंगा परिधान केलेली दिसत आहे. तिच्या या लेहंग्यावर १४ किलो सोन्याचा मुलामा असल्याचे पाहायला मिळत असल्यामुळे सध्या विविध चर्चांना उधाण आले आहे. या चित्रपटाशी निगडीत एक व्हिडिओसुद्धा युट्यूबवर प्रदर्शित करण्यात आला आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला एक भलामोठा दरवाजा उघडल्यानंतर प्रथम दृष्टीक्षेपात एक रांगोळी नजरेस पडते. त्यानंतर त्या रांगोळीवर प्रज्ञाचे छायाचित्र पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये तीने हिरव्या रंगाचा लेहंगा परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे. या लेहंग्याच्या हिरव्या रंगापेक्षा जास्त तर सोन्याची लकाकीच पाहायला मिळत आहे.

दरम्यान, नागार्जुनच्या चाहत्यांनाही या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे. या चित्रपटातील फर्स्ट लूक प्रदर्शित झाल्यानंतरच अभिनेत्री प्रज्ञाने १४ किलो सोन्याचा लेहंगा परिधान केल्याचे सांगितले गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे ही बाब कितपत खरी आहे याची पुर्तता अद्यापही करण्यात आलेली नाही. पण अभिनेत्री प्रज्ञाने मात्र तिच्या ट्विटर अकाऊंटवरुनही असेच म्हटले आहे. परिणामी सध्या सोशल मीडियावरही त्यासंदर्भातील चर्चांना उधाण आले आहे. या बहुचर्चित तेलगु चित्रपटामध्ये अभिनेता नागार्जुन, प्रज्ञा जैसवाल, अनुष्का शेट्टी हे कलाकारही झळकणार आहेत. राघवेंद्र राव यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. दाक्षिणात्या चित्रपटांमध्ये असे प्रयोग करण्याची ही काही पहिली वेळ नाही ही लक्षात घेण्याची बाब आहे.