News Flash

फ्लॅशबॅक : प्रेम नाम है मेरा…!

जिभेवर लालसा आणि बोलण्यात जालिम चढउतार...

चेहर्‍यावर विकृत हास्य, अधेमधे डोळे वटारून पाहण्याची सवय, जिभेवर लालसा आणि बोलण्यात जालिम चढउतार… अर्थात मसालेदार मनोरंजन हिंदी चित्रपटातील खलनायकाचा हा हुकमी फंडा.  प्राणने हिंदी चित्रपटसृष्टीत खौफनाक, क्रूरकर्मा ‘व्हीलन ‘ म्हणून राज्य करतानाच इतरही काही अभिनेते आपापल्या शैलीने खलनायकी करत होतेच. त्यात आपले हुकमी स्थान निर्माण केले ते, प्रेम चोप्राने!
त्याच्या एकूणच कारकिर्दीचा हिंदी चित्रपटसृष्टीने नुकताच गौरव केला. खरं तर त्याचा पहिला चित्रपट ‘हम हिन्दुस्तानी’ १९६० साली प्रदर्शित झाला. पण त्या काळात एकाच शिफ्टमध्ये चित्रीकरण होई . त्यामुळेच एकेक चित्रपट पूर्ण होण्यास तीन-चार वर्षे लागत. चित्रपटसृष्टीने तेच विचारात घेऊन त्याचा सत्कार केला. आणखीन एक विशेष म्हणजे पन्नासच्या दशकात प्रेम चोप्रा ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या टाईम डिपार्टमेंटमध्ये नोकरीस असतानाच सुनील दत्तच्या ‘डमी’चे काम करत हिंदी चित्रपटसृष्टीत शिरण्याचा प्रयत्न करीत होता.

‘मुड मुड के ना देख ‘ इत्यादी काही चित्रपटातून छोट्या छोट्या भूमिका करणार्‍या प्रेम चोप्राला पहिले यश ‘वह कौन थी ‘ (१९६४) ने दिले. कशी गंमत आहे बघा, प्राणने मनोजकुमारच्या ‘उपकार ‘( १९६७) मधील मंगलचाचा भूमिकेव्दारे चरित्र भूमिकेकडे वळणे पसंद केले, त्याच ‘उपकार’मधील प्रेम चोप्राचा कपटीपणा प्रेक्षकांना आवडला . प्रेम चोप्रा नावाचे युग आता वेग घेऊ लागले आणि मग जवळपास चौथ्या चित्रपटात प्रेम चोप्राची व्हीलनगिरी रंगू लागली. त्याच्या कुटील डावपेचात अनेकदा त्याला बिंदूची साथ लाभे. अनेक चित्रपटात त्याने नायिकेवर वाईट नजर टाकलीय म्हणूनच हीरोचा बेदम मारही खाल्लाय.

तरी काही चित्रपट विशेषच. राज कपूर दिग्दर्शित ‘बॉबी’च्या प्रेमिकांना ( ऋषि कपूर व डिंपल कापडिया) हाच अखेरीस अडथळा आणत म्हणतो, ‘प्रेम नाम है मेरा…’ प्रेम चोप्राचे एवढे बोलणेही शिसारी आणणारे होते. ही त्याच्या अभिनयाला मोठीच दाद होय. तर त्यानंतर जवळपास तीस वर्षांनी मराठीत याच नावाचे नाटक येतानाच शिवाजी मंदिरच्या पहिल्याच प्रयोगाला खुद्द प्रेम चोप्रा हजर हे तर केवढे कौतुकास्पद.

नरेन्द्र बेदी दिग्दर्शित ‘बेनाम’ (१९७४) मधील प्रेम चोप्रा केवढा तरी रहस्यमय. चित्रपटाच्या पूर्वप्रसिध्दीत त्याला अजिबात स्थानच नव्हते. पण फर्स्ट डे फर्स्ट शोला गेलेल्या प्रेक्षकांना चित्रपटाच्या क्लायमॅक्सला जबरा धक्काच बसला. अमिताभ बच्चन पोलिसांना मदत करत करत त्याला फोनवरून धमकावण्याऱ्याचा शोध घेत असतानाच एका सामाजिक कार्यक्रमात त्याच आवाजाच्या दिशेने तो धावतो… तेव्हा प्रेम चोप्राला पाहून आपणही चक्रावतो. कारण चित्रपटातील सस्पेन्स कायम ठेवण्यासाठी प्रेम चोप्राला चक्क कादर खानचा आवाज दिल्याचे स्पष्ट होते.

प्रेम चोप्राने शहीद, दो रास्ते, कटी पतंग, राजा जानी, अजनबी, द ग्रेट गॅम्बलर, बैराग, छुपा रुस्तम, देस परदेस, दाग, प्रेम रोग, आँचल इत्यादी अनेक चित्रपटातून भूमिका साकारताना बरेच गेटअप केले, रुपे घेतली, कधी अक्राळविक्राळ नाचलाही, पडद्यावर सभ्यतेपासून दूर राहिलेला प्रेम चोप्रा प्रत्यक्षात सभ्य राहिलाय . भरभरून काम केल्यावर आणि खान हिरोंची पिढी जम बसवू लागताच चित्रपटापासून थोडासा दूरही झालाय इतकेच. पण हिंदी चित्रपटसृष्टीत साठ वर्षे पूर्ण करणे खूपच कौतुकास्पद आहे.
दिलीप ठाकूर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2017 4:10 am

Web Title: flashback by dilip thakur about bollywood actor prem chopra
Next Stories
1 मधुकर वृत्तीने तबलावादन शिकलो
2 माझ्या वडिलांची ही मिराशी
3 कौशिकी चक्रवर्ती यांच्या मैफलीची रसिकांवर मोहिनी
Just Now!
X