गर्लफ्रेंड निरू रंधावा हिला मारहाण केल्याप्रकरणी अखेर अभिनेता अरमान कोहलीला अटक करण्यात आली आहे. लोणावळा येथून त्याच्या मित्राच्या फार्म हाऊसवरून त्याला पोलिसांनी अटक केली. गेल्या रविवारी अरमानविरोधात सांताक्रूझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अरमानने केलेल्या मारहाणीत निरु रंधावाला गंभीर इजा झाली असून उपचारासाठी तिला कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हे दोघेही २०१५ पासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत.

निरुने तक्रार दाखल केल्यापासून अरमान फरार होता. चौकशीसाठी पोलीस त्याचा शोध घेत होते. दरम्यान त्याच्या वडिलांशीही पोलिसांनी संपर्क साधला असता आपल्याला काहीच माहित नसल्याचे त्यांनी सांगितले. अखेर लोणावळा येथून मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली.
एका क्षुल्लक गोष्टीवरून अरमान आणि निरुमध्ये भांडण झाले होते आणि त्यानंतर रागाच्या भरात अरमानने तिला बेदम मारहाण केली होती.

फेब्रुवारीमध्ये झालेल्या एका वादात अरमानने तिच्यावर हात उगारला होता. मात्र त्यावेळी निरुने यासंबंधी कुठेच वाच्यता केली नाही. त्याच घटनेची पुनरावृत्ती झाल्याने निरुने अखेर सांताक्रुझ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. निरुच्या तक्रारीवरूनच अरमानविरोधात कलम ३२३, ३२६, ५०४ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

अरमानकडून मारहाण झाल्याच्या तक्रारी त्याच्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसींकडूनही करण्यात आल्या होत्या. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम अभिनेत्री मुनमुन दत्तानेही २०१३मध्ये अरमानविरोधात मारहाणीचा आरोप केला होता. बिग बॉस या रिअॅलिटी स्पर्धेतही त्याने सहस्पर्धक सोफिया हयातवर हात उगारल्याप्रकरणी त्याला अटक झाली होती. त्यानंतर जामिनावर तो सुटला होता. ‘बिग बॉस’दरम्यान अरमान आणि काजोलची बहिण तनिषा मुखर्जी यांच्यात जवळीक वाढली. मात्र अरमानच्या तापट स्वभावामुळे त्यांचा ब्रेकअप झाला होता.