बऱ्याच मराठी कलाकारांच्या घरी आज बाप्पाचं जल्लोषात आगमन झालं. मराठी सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरी देखील गणेशोत्सवाचा उत्साह दिसून आला. गेल्या ३० वर्षांपासून तिच्या घरी गणपती प्रतिष्ठापना केली जाते. पिंपरी-चिंचवडमधील निगडीतील निवास्थानी यानिमित्ताने उत्साहाचे उधाण आल्याचे पाहायला मिळाले. सोनालीच्या घरी दहा दिवासांचा गणपती बसवण्यात आलाय. चित्रिकरणातील कामातून वेळ काढून तिने आपल्या घरी गणपतीची प्रतिष्ठापणा केली. गणपतीची आरास तिने अगदीच साध्या पद्धतीने केल्याचे दिसते. बाप्पाच्याभोवती सजावट करण्यासाठी फुलांचा अधिक वापर करण्यात आलाय. ३० वर्षांपासून कुलकर्णी कुटुंबिय गणेशाची मनोभावे पूजा करत आहेत. पर्यावरणाचे जतन करण्यासाठी तिच्या घरी शाडूच्या मातीची गणेश मूर्तीं आणली जाते. सोनाली स्वत: गणपतीची प्रतिष्ठापना आणि गणपती विसर्जन करते.

गणेशोत्सवाच्या काळात आयोजित होणाऱ्या अनेक कार्यक्रमात भाग घेतला असून याच कार्यक्रमाच्या माध्यमातूनच यश मिळाल्याचे सोनालीने यावेळी सांगितले. महाराष्ट्र आणि मराठी नागरिकांसाठी गणेश उत्सव हा महत्वाचा असतो. तसेच कलाकारांसाठी गणपती हे एक दैवत असल्याचं ती म्हणाली. सोनालीचा पहिला चित्रपट हा गणेश उत्सवाच्या काळातच प्रदर्शित झाला होता. त्यामुळं तिला गणेश उत्सव नेहमीच महत्वाचा वाटतो. सोनाली लवकरच ‘तुला कळणार नाही’ या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट गणेशोत्सवानंतर दोन दिवसांनी प्रदर्शित होणार असल्यामुळे ती खूपच आनंदी आहे.