सध्या देशावर करोना विषाणूचं सावट आहे. त्यामुळे प्रत्येक सण, उत्सव साध्या पद्धतीनेच साजरे करावे लागत आहेत. परंतु, या काळातही गणेशभक्तांच्या चेहऱ्यावर तितकाच आनंद झळकत असल्याचं दिसून येत आहे. दरवर्षी सार्वजनिक मंडळांमध्ये किंवा घरांमध्ये गणेशोत्सवाची ठराविक गाणी लावली जातात. विशेष म्हणजे यातली काही गाणी अशी आहेत ज्यांची नवलाई तसूभरही कमी झालेली नाही. चला तर मग पाहुयात गणेशोत्सवाची शोभा वाढविणारी काही निवडक गाणी-
१. अष्टविनायका तुझा महिमा कसा –
१९७९ साली प्रदर्शित झालेल्या अष्टविनायक या चित्रपटातील अष्टविनायका तुझा महिमा कसा हे गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे. या गाण्याला अनुराधा पौडवाल, जयवंत कुळकर्णी, चंद्रशेखर गाडगीळ, मल्लेश आणि शरद जांभेकर यांचा स्वरसाज चढला आहे. तर जगदीश खेबुडकर यांनी गाण्याची रचना केली आहे. या गाण्याला अनिल-अरुण यांनी संगीत दिलं आहे.
२. तुज मागतो मी आता –
हे गाणं रामकृष्ण बापू सोमयाजी यांनी रचलं असून लता मंगेशकर यांनी गायलं आहे. तर संगीत पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलं आहे.
३. ओंकार स्वरूपा –
ओंकार स्वरुपा या गीतसंग्रहातील हे गाणं लोकप्रिय गायक सुरेश वाडकर यांनी गायलं असून श्रीधर फडके यांच्या संगीताचा साज या गाण्याला चढला आहे. या गाण्याची मूळ रचना संत एकनाथ यांनी केलं आहे. १९८७ पासून लोकप्रिय ठरलेलं हे गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे.
४. पार्वतीच्या बाळा –
गणपतीसमोर हमखास लावलं जाणारं गाणं म्हणजे ‘पार्वतीच्या बाळा’. या गाण्यातील आनंद शिंदे यांच्या आवाजाने परिसर दुमदुमतो. हे गाणं दुसऱ्या कोणाच्या आवाजात ऐकलं तरी ती मजा येत नाही. त्यामुळे दरवर्षी हे गाणं गणेशोत्सवात आवर्जुन लावलं जातं.
५. उठा उठा सकळीक –
गानकोकिळा लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गाण्याचं संगीत पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलं आहे. तर रचना रामानंद यांनी केली आहे.
६. अशी चिकमोत्याची माळ-
या गाण्यांप्रमाणेच अनेक चित्रपटांमध्ये बाप्पावर आधारित गाण्यांची निर्मिती करण्यात आली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 21, 2020 12:23 pm