देशभरामध्ये लाडक्या गणरायाच्या आगमनाला सुरुवात झाली असून सर्वत्र उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येक जण बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. यामध्ये मराठी कलाकारीही मागे नाहीत. ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतून नावारुपाला आलेली अभिनेत्री मयुरी देशमुखने सुद्धा बाप्पाच्या आगमनाची तयारी केली आहे. याविषयी बोलत असताना तिने बाप्पाची कोणती मूर्ती सर्वात जास्त आवडते हेदेखील सांगितलं.

सध्या पाहायला गेलो तर बाजारामध्ये गणपतीच्या वेगवेगळ्या आकाराच्या आणि नव्या डिझाइनच्या मूर्ती पाहायला मिळतात. काही मूर्ती या हिरेजडीत असतात. तर काही गरुडारुढ, अश्वारुढ किंवा मोरावर विराजमान झालेल्या असतात. बदलत्या काळानुसार, मुर्त्यांचं स्वरुपही बदलत आहे. पूर्वी शाडूच्या मातीपासून मूर्ती तयार करण्यात येत होत्या. मात्र आता त्याची जागी पिओपीने घेतली आहे. पिओपीच्या मूर्ती विसर्जन केल्यानंतर त्या पाण्यामध्ये विरघळत नाही. त्यामुळे जलप्रदूषण होण्याची मोठी शक्यता असते. त्यामुळेच यावर उपाय म्हणून सध्या ‘टी ट्री गणेशा’ बाजारात उपलब्ध झाले आहेत. या टी ट्री गणेशामुळे थोडंही जलप्रदूषण होत नसून आपला बाप्पा आपल्यासोबत कायम राहतो. त्यामुळे मयुरीलादेखील हाच बाप्पा सर्वाधिक प्रिय आहे.

“गणपती हे माझे आवडते दैवत असल्याने गणेश चतुर्थी माझ्यासाठी खूप खास आहे. माझ्या घरी गणपतीचं आगमन होतं नाही,मात्र माझ्या आईकडे गणपती असतो. त्यामुळे मी कायम तिकडे जाऊन गणेशोत्सव सेलिब्रेट करते. आमच्याकडे कायम इको- फ्रेंडली गणपतीचं आगमन होतं.सध्या ‘टी ट्री गणेशा’ मिळतो, ज्यात गणेशाची मातीची मूर्ती कुंडीत असते. विसर्जनाच्या वेळी फक्त पाणी टाकून ती मातीसारख्या पातळीवर आणायची. त्यात एक बी असते. त्याचे नंतर झाड येते. मला ही संकल्पना खूप आवडली. त्यामुळे आमच्याकडे गणेशाची अशा पद्धतीची मूर्ती आणली जाते”, असं मयुरी म्हणाली.

दरम्यान, विविध मालिका आणि काही चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली मयुरी लवकरच ‘लग्नकल्लोळ’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत भूषण प्रधान स्क्रीन शेअर करणार आहे. तर डॉ. मयूर तिरमखे, अण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगलाबाई अण्णासाहेब तिरमखे यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे.