एके काळी ‘बिनधास्त’ चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री गौतमी गाडगीळ कपूर त्या वेळी हिंदी मालिकांच्या दुनियेत शिरली. छोटय़ा पडद्यावरही एकता कपूरच्या मालिकांमधूनही तितकीच यशस्वी ठरलेल्या गौतमीने अभिनेता राम कपूरशी विवाह केल्यानंतर एकूणच कारकीर्दीला अर्धविराम दिला होता. सध्या गौतमी पुन्हा हिंदी मालिका आणि चित्रपटांमधून सक्रिय झाली आहे. सोनी टीव्हीवर गाजलेल्या ‘परवरिश’ मालिकेच्या दुसऱ्या पर्वात गौतमी काम करते आहे. सातत्याने हिंदीत काम करीत राहिल्याने आपल्याला मराठी चित्रपटांमध्ये रस नाही, असा बहुधा लोकांचा समज झाला असावा. मला खरोखरच मराठी चित्रपटात काम करायचे आहे, असे गौतमीने ‘वृत्तांत’शी बोलताना सांगितले.
‘परवरिश-२’ या मालिकेत गौतमी सतत मुलीची काळजी करणाऱ्या, तिच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून असलेल्या आईच्या भूमिकेत आहे. या मालिकेतील प्रत्येक संदर्भाशी मी आता स्वत:शी जोडू शकते. मी दोन मुलांची आई आहे. सध्याच्या परिस्थितीत मुलांवर पालकांचे लक्ष असणे गरजेचे आहे. फरक एवढाच असला की त्यांच्यावर दबाव न आणता, मैत्रीच्या नात्याने त्यांना समजून घेणे आवश्यक आहे. आपण सतत त्यांच्या रक्षकाच्या भूमिकेत राहिलो तर ते आपल्यापासून दूर जातात, ही गोष्ट पालकांनी समजून घेतली पाहिजे, असे गौतमी म्हणते. ‘परवरिश’च्या पहिल्या पर्वात पालकही चुकतमाकतच शिकत असतात, पण त्यांनी मुलांना समजून घेतले पाहिजे, ही गोष्ट अधोरेखित करण्यात आली होती. दुसऱ्या पर्वात हाच विचार पुढे नेला असल्याचे गौतमीने सांगितले.
मुले आणि पालकांचे नाते मैत्रीचे असलेच पाहिजे. आजकाल चार वर्षांच्या मुलालाही स्वत:चे मत असते. त्यामुळे त्यांना मित्रत्वाच्या नात्याने सांभाळून घेतानाच आपण त्यांचे पालक आहोत, हेही विसरून चालणार नाही, असे गौतमी स्पष्ट करते. आपल्या आई-वडिलांनी जे संस्कार दिले त्यांचा आधार घेत काळानुरूप होत चाललेल्या बदलांशी सांगड घालून आपले पालकत्व असले पाहिजे, हा विचार दुसऱ्या पर्वात मांडला आहे. त्यामुळे दुसऱ्या पर्वात काम करायला मिळाल्याचा जास्त आनंद असल्याचे गौतमीने सांगितले. तिच्या मते छोटय़ा पडद्यावरही आजही सास-बहू सागाच सुरू आहे. त्यामुळे ‘परवरिश’सारखी मालिका जी नवनव्या पर्वात, नव्या विचारांनी येऊ शकते, अशा मालिकांची संख्या वाढायला हवी, असे तिने सांगितले. अनिल कपूर यांची ‘२४’ ही मालिका गाजली. आता त्याचेही दुसरे पर्व येते आहे. वर्षभर एक मालिका, त्यानंतर एका गॅपने पुन्हा त्याच मालिके चे दुसरे पर्व सादर करताना त्यात सगळ्याच गोष्टी बदलतात, त्यात नावीन्य राहते. प्रेक्षक आणि कलाकार या दोघांनाही या मालिकांमुळे आनंद मिळेल, असे मत गौतमीने व्यक्त केले.

सातत्याने हिंदीत काम करीत राहिल्याने आपल्याला मराठी चित्रपटांमध्ये रस नाही, असा बहुधा लोकांचा समज झाला असावा. मला खरोखरच मराठी चित्रपटात काम करायचे आहे
– गौतमी गाडगीळ कपूर

actor pratik gandhi talks about experience working with vidya balan
‘चरित्रपटांचं आव्हान अधिक भावतं’
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
swanand kirkires article on kumar gandharv
आठवणींचा सराफा: गुरू तो सारिखा कोई नाही…