भारताचं राजकारण हे सिनेनिर्मात्यांसाठी नेहमीच आकर्षणाचा विषय ठरला आहे. भारतीय राजकारणातील एका महत्त्वाच्या अध्यायावर आधारलेला The Accidental Prime Minister ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जीवनावर आधारलेल्या या चित्रपटात अनुपम खेर महत्त्वाची भूमिका साकरात आहे. तर याच चित्रपटातील दुसरी महत्त्वाची भूमिका एक जर्मन अभिनेत्री साकारणार आहे.

सोनिया गांधी यांच्या भूमिकेसाठी सुझेन बर्नर्ट हिची निवड करण्यात आली आहे. हा चेहरा भारतीय प्रेक्षकांना बऱ्यापैकी परिचयाचा आहे. अनेक चित्रपटात आणि मालिकांत ती झळकली आहे. ‘चक्रवर्ती अशोक सम्राट’ या मालिकेत सूझेन यांनी काम केलं आहे. भारतीय मालिकांत खलनायिकेची भूमिका साकारणारी सूझेन ही पहिली परदेशी कलाकार ठरली. या चित्रपटात ती महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. या गोष्टीला तिनं ट्विटरवरून अधिकृतरित्या दुजोरा दिला आहे.

वाचा : अमित शाहांच्या रॅलीमुळे तब्बल पाच तास वाहतूक कोंडीत अडकले अमिताभ बच्चन

याआधीही सुझेन यांनी ‘प्रधानमंत्री’ या मालिकेतून सोनिया गांधीची भूमिका साकारली होती. त्यामुळे या चित्रपटासाठी साहजिक त्यांची निवड होणं अपेक्षित होतं. मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार असणाऱ्या संजय बारू लिखित ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर- मेकिंग अँड अमेकिंग ऑफ मनमोहन सिंग’ या पुस्तकावर या बहुचर्चित चित्रपटाचं कथानक आधारित आहे. २१ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याचित्रपटात अनुपम खेर आणि सुझेनव्यतिरिक्त आहाना कुमरा आणि अक्षय खन्नादेखील आहे. आहाना ही प्रियांका गांधींची भूमिका साकारणार आहे तर अक्षय खन्ना संजय बारू यांच्या भूमिकेत चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

वाचा : सलमान दोषी ठरल्याने ‘या’ अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना