‘स्टार प्लस’ वाहिनीवरुन लवकरच ‘टेड टॉक्स’ हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा कार्यक्रम प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याविषयीच्या प्रचंड चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यामागचं कारणही तसंच आहे. शाहरुख खान सूत्रसंचालन करत असलेल्या ‘टेड टॉक्स’मध्ये येणाऱ्या पाहुण्यांची यादीही फार लांबलचक असून, ते पाहुणे फार खास आहेत. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिच्यामागोमाग आता गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ सुंदर पिचाई यांनीसुद्धा किंग खानच्या या कार्यक्रमात हजेरी लावली.

सुंदर पिचाई यांच्यासोबतचा भाग चित्रीत करण्यासाठी ‘स्टार प्लस’ वाहिनीतर्फे खास व्यवस्था करण्यात आली होती. ‘बिम’ या टेलिप्रेजेन्स रोबोटची मदतही घेण्यात आली होती. यावेळी पिचाई यांनी कॅलिफोर्नियाहून शाहरुखसोबत संवाद साधला.

‘टेड’चा (TED) खरा अर्थ टेक्नॉलॉजी (तंत्रज्ञान), एन्टरटेन्मेन्ट (मनोरंजन) आणि डिझाइन असा होते. त्यामुळे याच मुख्य घटकांवर ‘टेड टॉक्स’ आधारलेला असणार आहे. दरम्यान, ‘टेड टॉक्स’मध्ये याआधी जावेद अख्तर, निर्माता- दिग्दर्शक करण जोहर आणि एकता कपूर यांनीही हजेरी लावली होती. या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींचे अनुभव, त्यांच्या संघर्षांची कहाणी सर्वांपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे या प्रसिद्ध चेहऱ्यांच्या यशाचं गमक सर्वांपर्यंतच पोहोचणार आहे असं म्हणायला हरकत नाही. सेलिब्रिटी किंवा कोणा एका प्रसिद्ध व्यक्तीच्या यशाचं रहस्य आणि त्यांचा प्रवास प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. पण, टेड टॉक्सचं एकंदर स्वरुप पाहता या कार्यक्रमाबद्दलची उत्सुकता आणखीनच शिगेला पोहोचली आहे.

वाचा : अक्षयसोबत प्रियांकाचं नाव जोडताच ट्विंकलचा राग अनावर