ब्रिटनचे दिग्दर्शक स्टीव्ह मॅकक्वीन यांच्या ‘ट्वेल्व्ह इयर्स अ स्लेव्ह’ या चित्रपटाला बाफ्टा २०१४ पुरस्कार सोहळ्यात दोन मोठे पुरस्कार मिळाले, तर अलफॉन्सो क्युरॉन यांच्या ‘ग्रॅव्हिटी’ या त्रिमिती चित्रपटाला सहा पुरस्कार मिळाले आहेत.  ‘ट्वेल्व्ह इयर्स अ स्लेव्ह’ हा चित्रपट गुलामगिरी विषयावर आहे, तर ‘ग्रॅव्हिटी’ हा अवकाश संशोधनाशी निगडित चित्रपट आहे.
अमेरिकेतील गुलामगिरीचे अस्वस्थ करणारे चित्र उभे करणाऱ्या ‘ट्वेल्व्ह इयर्स अ स्लेव्ह’ या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला असून त्यातील प्रमुख अभिनेता शिवेटल एजिओफोर  (वय ३६) याला उत्कृष्ट अभिनेता म्हणून घोषित करण्यात आले. एका स्वतंत्र व्यक्तीला गुलाम म्हणून विकले जाते व नंतर त्याच्या वाटेला काय भोग येतात ते यात दाखवले आहे. २१ दशलक्ष लोक सध्या गुलामगिरीत खितपत आहेत. आणखी दीडशे वर्षांनी असे वातावरण असावे की, चित्रपट निर्मात्यांना असे चित्रपट काढण्याची संधी मिळू नये असे मॅकक्वीन यांनी सांगितले. एजिओफोर या अभिनेत्याने आपला पुरस्कार दिग्दर्शकांना अर्पण केला.
मॅकक्वीन ( वय४४) यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार गमवावा लागला. तो पुरस्कार ‘ग्रॅव्हिटी’ चित्रपटाचे हेल्मर क्युरॉन यांना मिळाला. मेक्सिकन दिग्दर्शक अशलेले क्युरॉन यांनी सांगितले की, तेरा वर्षे आपण लंडनमध्ये राहिलो, आपले उच्चार वेगळे आहेत पण आपण ब्रिटिश चित्रपट उद्योगाचा आता भाग बनलो आहोत. सँड्रा बुलक या अभिनेत्रीशिवाय हे यश शक्य नव्हते असे ते म्हणाले. उत्कृष्ट ब्रिटिश चित्रपट, उत्कृष्ट छायालेखन, उत्कृष्ट ध्वनिसंयोजन, उत्कृष्ट दृश्य परिणाम हे सर्व पुरस्कार या चित्रपटाने पटकावले आहेत. उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार केट ब्लानचेट हिला ‘ब्लू जस्मीन’ या चित्रपटातील भूमिकेसाठी मिळाला. या चित्रपटाचा दिग्दर्शक वुडी अॅलेन याचे नाव ब्लानचेट यांनी घेतले नाही, कारण त्यांच्यावर दत्तक मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. ब्लॅनचेट यांनी दिवंगत अभिनेते फिलीप सेमूर हॉफमन यांचा उल्लेख करून त्यांना पुरस्कार अर्पण केला. ‘अमेरिकन हसल’ मधील जेनिफर लॉरेन्स हिला उत्कृष्ट सहअभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. त्या चित्रपटास उत्कृष्ट पटकथा व उत्कृष्ट वेशभूषा व केशरचना हे पुरस्कारही मिळाले. ‘कॅप्टन फिलिप्स’ मधील बारखाड अब्दी याला उत्कृष्ट सहअभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. त्याने सोमाली चाच्याची भूमिका केली आहे.
डिस्नेचा त्रिमिती चित्रपट ‘फ्रोझन’ हा उत्कृष्ट अॅनिमेटेड चित्रपट ठरला . ख्रिस बक व जेनिफर ली यांनी सर्व संबंधितांचे आभार मानले. ब्रिटनच्या शॉर्ट अॅनिमेशनचा पुरस्कार जेम्स वॉकर, सारा वुलनेर व युसिफ अल खलिफा यांना ‘स्लीपिंग विथ फिशेस’ या अॅनिमेशनपटासाठी मिळाला. ब्रिटिश लघुपटाचा पुरस्कार जेम्स ग्रिफीथ व सोफी वेन्नर यांना ‘रूम ८’ या चित्रपटासाठी मिळाला. उत्कृष्ट निर्मितीचा व वेशभूषेचा पुरस्कार ‘द ग्रेट गॅटसबाय’ या चित्रपटास मिळाला. फॉम्र्युला १ चित्रपट ‘रश’ला उत्कृष्ट संपादनाचा पुरस्कार मिळाला. फिलोमेना चित्रपटातील स्टीव्ह कुगन व जेफ पोप यांना उत्कृष्ट रूपांतरित चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. हा चित्रपट मार्टिन सिक्सस्मिथ यांच्या ‘द लॉस्ट चाइल्ड ऑफ फिलोमेना’ या पुस्तकावर आधारित आहे. ब्रिटनमधील चित्रपट सृष्टीत केलेल्या कामासाठी दिग्दर्शक पीटर ग्रीनवे यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. हेलेन मिरेन हिला बाफ्ताची महत्त्वाची फेलोशिप देण्यात आली. तिने राणीची भूमिका केली होती. तिला राणीचे नातू विल्यम यांनी फेलोशिप प्रदान केली. ‘इ-इ रायझिंग पुरस्कार’ विल पॉल्टर यांना मिळाला. पावलो सॉरेंटिनो यांच्या ‘द ग्रेट ब्युटी’ चित्रपटाला इंग्रजी सोडून अन्य भाषेतील उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.
बाफ्टा पुरस्कार कार्यक्रमाला प्रिन्स विल्यम, लिओनाडरे डी कॅप्रियो, टॉम हँकस, मॅट डॅमन, ख्रिस्तीयन बेल, ऑपरा विन्फ्रे, सँड्रा बुलक, अॅमी अॅडम्स, मायकेल फासबेंडर, ल्युपिटा, डॅनियल ब्रुल, एम्मा थॉमसन, ब्रॅडले कूपर , ब्रूस डर्न, ज्युडी डेन्च उपस्थित होते. स्टीफन फ्राय यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.