दोन गाजलेल्या स्पर्धक अभिनेत्रींचा पहिला चित्रपट आणि गुलाबी गँग नावाच्या अस्तित्वात असलेल्या महिला संघटनेवरचा चित्रपट म्हणून चर्चेत राहिलेल्या ‘गुलाब गँग’विषयी रसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. गुलाबी साडय़ांच्या पेहरावात महिलांवरील अन्याय, अत्याचाराच्या विरोधात लढा देणाऱ्या लढाऊ महिला आणि राजकारण असा विषय असलेला हा चित्रपट ‘लालभडक’ गुलाबी रंग दाखवितो. माधुरी दीक्षितने साकारलेली रज्जो आणि जुही चावलाने साकारलेली सुमित्रादेवी ही राजकारणी व्यक्तिरेखा, या दोघींची जुगलबंदी हाच चित्रपटातील महत्त्वाचा मुद्दा ठरतो. दिग्दर्शकही अभिनय जुगलबंदी दाखविण्यात यशस्वी ठरला आहे. परंतु, सरतेशेवटी सत् विरुद्ध असत् असा जुनाच फिल्मी फॉम्र्युला आणि गाण्यांचा भरणा यामुळे चित्रपट विशिष्ट उंचीवर जाऊ शकत नाही.
उत्तर प्रदेशात संपत पाल देवी यांनी स्थापन केलेल्या गुलाबी गँग या ग्रामीण महिलांची संघटना आणि त्यांचा लढा यावर बेतलेला हा चित्रपट आहे. चित्रपटाचे कथानक उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश राज्यांच्या सीमेवरील बुंदेलखंड प्रदेशात घडताना दाखविले आहे. रज्जो या लहानग्या मुलीला शिकण्याची खूप आवड आहे. परंतु, सावत्र आई शाळेत जाऊ देत नाही, घरकाम करायला सांगते. अशा मागासलेल्या वातावरणात राहूनही रज्जो शिकते. लहानपणापासून गावातील वातावरण, पुरुषप्रधान संस्कृती, शिक्षणाच्या अभावामुळे असलेले महिलांचे अज्ञान, महिलांवर होणारे अन्याय हे पाहात मोठी झालेली रज्जो पुढे गुलाब गँग नावाची संघटना स्थापन करते आणि मुलींना स्वसंरक्षण आणि शिक्षण देणारा आश्रम चालविते. रज्जोच्या आश्रमात तिने तयार केलेल्या माही, विनिता, कजरी अशा तरुणी आहेत. काठीने हाणामारी करण्याचे प्रशिक्षण आणि प्राथमिक शिक्षण देण्याचे काम करता करता गावातील, परिसरातील महिला, तरुणी, लहान मुली एवढेच नव्हे तर गावकऱ्यांवर सरकारीबाबू आणि स्थानिक राजकीय नेत्याकडून केल्या जाणाऱ्या अन्यायाविरुद्ध रज्जो आणि तिची गँग लढते आणि न्याय मिळवून देते. निवडणुकीचे वारे वाहू लागतात आणि रज्जोच्या गावात सुमित्रादेवी या एका महत्त्वाकांक्षी राजकारणी महिलेचा प्रवेश होतो. साम, दाम, दंड, भेद याचा वापर करून आपले वर्चस्व सिद्ध करायचे आणि पुरुषप्रधान राजकीय व्यवस्थेत राज्य करण्याची महत्त्वाकांक्षा असलेली सुमित्रादेवी आणि रज्जो यांच्यातील सामना हा चित्रपट अधोरेखित करतो.
कजरी नावाच्या एका तरुण विवाहितेला हुंडय़ासाठी तिचा नवरा आणि सासू घराबाहेर काढतात आणि आत्महत्या करायला निघालेल्या कजरीला गुलाब गँगच्या तरुणी आश्रमात घेऊन येतात. पुढे अन्यायाविरुद्ध कजरी उभी ठाकते आणि नवऱ्याला धडा शिकविते. सरकारीबाबू ५० हजारांची मागणी करतो. पैसे मिळत नाहीत म्हणून गावाची वीज कापतो. त्याला गुलाब गँग धडा शिकविते. पांडे या स्थानिक राजकीय नेत्याचा मुलगा आणि सुमित्रादेवीची बहीण यांचे लग्न ठरते. पांडे या राजकीय नेत्याचा मुलगा गावातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करतो. लग्नाची बोलणी करायला आलेल्या सुमित्रादेवीसमोर रज्जो घटनेची माहिती सांगते. परंतु, सुमित्रादेवी राजकीय पद्धतीने नुकसानभरपाई देऊ असे रज्जोला सांगते. इथून पुढे रज्जो विरुद्ध सुमित्रादेवी यांच्यातील संघर्षांवर चित्रपट बेतला आहे.
स्त्री शक्ती, महिलांमधील आंतरिक ताकद, तिच्यातील दुर्गा देवीचे रूप दाखविणे हा लेखक-दिग्दर्शकाचा उद्देश सफल झाला आहे. परंतु, अनेक ठिकाणी आता आपल्याला रज्जो-सुमित्रादेवी यांच्यातील संघर्ष आणि तणाव तसेच माधुरी-जुही यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळणार असे प्रसंग येत असताना गाणी घुसडली आहेत. गाण्यांच्या भडिमारामुळे गंभीर विषय असलेला चित्रपट फिल्मी वाटेने जातो. गल्लाभरू पद्धतीने गाण्यांची रचना, नृत्य रसभंग करतात.
महिला राजकारणी असूनही पुरुषांवर वर्चस्व सिद्ध करण्याचा सुमित्रादेवी वारंवार प्रयत्न करते. त्यासाठी योजलेले प्रसंग, संवाद याला दाद द्यायला हवी. जुही चावला आणि माधुरी दीक्षित यांची अभिनय जुगलबंदी दाखविण्यात चित्रपट यशस्वी ठरला आहे. वास्तविक या गंभीर विषयावर चित्रपट करताना बरेच काही दाखविण्याची घाई दिग्दर्शक करतो. त्यामुळे शेवटच्या महत्त्वाच्या प्रसंगातील हाणामारी, बंदुकीच्या फैरी याचे कॅमेऱ्यात चित्रीकरण केले जाते असे दाखविले आहे. रज्जो सुमित्रादेवीच्या हातावर वार करते आणि एकदम तुरुंगातच जाते. शेवटचे दोन प्रसंग खूप घाईघाईत दाखविल्याने काहीच स्पष्ट होत नाही. प्रेक्षक गोंधळतो. मात्र एकंदरीत चित्रपट बॉलीवूडच्या फॉम्र्युलाप्रमाणे प्रेक्षकासमोर येत असल्यामुळे रंजक ठरतो.
‘गुलाब गॅँग’
निर्माता- अनुभव सिन्हा, अलुम्ब्रा एण्टरटेन्मेंट, अभिनय देव
दिग्दर्शक- सौमिक सेन
लेखक- सौमिक सेन, अनुभव सिन्हा
संगीत- सौमिक सेन
कलावंत- माधुरी दीक्षित, जुही चावला, दिव्या जगदाळे, तनिष्ठा चटर्जी, प्रियांका बोस, लता सिंग, विनिता मेनन, राणी पटेल, तन्वी राव.