हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शक गुड्डू धनुआ यांचा ‘गुलाबी’ हा पहिला मराठी चित्रपट आहे. त्यामुळे तो हिंदीच्या तद्दन गल्लाभरू पद्धतीने केलेला चित्रपट झाला आहे. मराठीतला पूर्णपणे मसालापट असा हा चित्रपट हिंदीतील तद्दन चित्रपटाप्रमाणे भडक, बटबटीत आहे. सचिन खेडेकर, पाखी हेगडे यांच्या प्रमुख भूमिका, सचिन खेडेकरने रंगविलेला पोलीस अधिकारी, त्यांचा अभिनय हेच या चित्रपटाचे बलस्थान म्हणता येईल.
बारबाला आणि पोलीस अधिकारी यांच्यातील प्रेम हा चित्रपटाचा विषय आहे. मद्यपान, धुम्रपान कसलेच व्यसन नसलेला कर्तव्यदक्ष आणि अविवाहित सज्जन पोलीस अधिकारी अर्जुन मालवणकर सचिन खेडेकर यांनी साकारला आहे. आजच्या काळातील राजकारणी, बिल्डर, डान्स बार संस्कृती, बारमालक-राजकारणी यांचे हितसंबंध आणि आपले ईप्सित साध्य होत नाही म्हणून कोणत्याही थराला जाण्याची प्रवृत्ती या गोष्टी चित्रपटातून प्रकर्षांने दाखविल्या आहेत. अर्थात दिग्दर्शकाने हे सगळे हिंदीच्या तद्दन गल्लाभरू चित्रपटाप्रमाणे बटबटीत पद्धतीने प्रेक्षकासमोर येते. सरपोतदार या मंत्र्यांच्या सांगण्यावरून डान्स बार बंद करण्याचा विडा अर्जुन मालवणकर उचलतो. त्यातच एका बारबालेच्या प्रेमात पडलेला एक तरुण रागाच्या भरात आपल्या आईची हत्या करतो. तो प्रेमात पडलेली बारबाला कोण याचा शोध अर्जुन मालवणकर घेतो आणि त्या बारवर छापा घालतो. या छाप्यातून गुलाबी या बारबालेच्या प्रेमात पडून तरुणाने आपल्या आईची हत्या केल्याचे समजते. म्हणून अर्जुन मालवणकर गुलाबी या बारबालेला समज देतो.  त्यामुळे गुलाबी ही बारबाला असलेल्या बारच्या मालकावर आणि बारवर अधूनमधून छापे घालून तो बार बंद पाडण्यासाठी अर्जुन मालवणकर प्रयत्न करतो. या अर्जुन मालवणकरला धडा शिकवितानाच त्याला आपल्यावर पैसे उधळायला लावण्याची गुलाबी बारमालकासोबत पैज लावते. यात ती यशस्वी होते की अर्जुन मालवणकर जिंकतो यावर चित्रपट बेतलेला आहे.
स्वीकारलेली कोणतीही भूमिका ताकदीनेच साकारायची ही सचिन खेडेकर यांची खासियत या चित्रपटातही चोखपणे दिसली आहे. पाखी हेगडेनेही गुलाबी चांगली साकारली आहे. डान्स बार संस्कृती दाखवायची असल्यामुळे भडक रंगांचा वापर, तिथली गाणी यातले वास्तव दिग्दर्शक दाखवितो हे समजून घेण्यासारखे आहे. तरीसुद्धा आजच्या काळात हिंदीतलाच फॉम्र्युला मराठीत जसाच्या तसा वापरल्यामुळे मराठी प्रेक्षकांना तो हमखास रुचेल असे मानून निर्मात्यांनी हा चित्रपट केला आहे असे दिसते. अतिबटबटीतपणाचे सादरीकरण टाळून आणि गल्लाभरू दृष्टिकोन बाळगूनही चित्रपट बनविता येऊ शकला असता. सचिन खेडेकर यांच्या चाहत्यांना त्यांच्या प्रतिमेच्या बाहेरील अर्जुन मालवणकर ही व्यक्तिरेखा पाहून आश्चर्यही वाटू शकेल. विषयात आणि सादरीकरणात कोणतेही नावीन्य नसल्यामुळे हा मसालापट एवढेच म्हणावे लागेल. दिवंगत अभिनेते विनय आपटे यांनी साकारलेला राजकारणी पुन्हा एकदा पाहायला मिळेल.
हा चित्रपट पाहता ‘पिंजरा’ चित्रपटाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. या गाजलेल्या चित्रपटाच्या संकल्पनेची भ्रष्ट नक्कल दिग्दर्शकाने केली आहे.
गुलाबी
निर्माते – संतोष धनुआ, अनिकेत कर्णिक, रेणुका कर्णिक, जय महाराष्ट्र फिल्म्स
दिग्दर्शक – गुड्डू धनुआ
लेखक – संजय चौहान
संगीत – दिलीप सेन, संतोक सिंग धालीवाल
कलावंत – सचिन खेडेकर, पाखी हेगडे, विनय आपटे, विनीत शर्मा