चित्रपट समीक्षक व प्रेक्षकांकडून दाद मिळवणारा रणवीर सिंग व आलिया भट्टचा ‘गली बॉय’ हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत उतरला आहे. प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ‘ऑस्कर’ पुरस्कारासाठी भारताकडून ‘गली बॉय’ची निवड करण्यात आली आहे. झोया अख्तर दिग्दर्शित ‘गली बॉय’ या चित्रपटात झोपडपट्टीत लहानाचा मोठा झालेला आणि आपल्या स्वप्नांसाठी धडपडणाऱ्या २६ वर्षीय डिव्हाइन या प्रसिद्ध रॅपरची कथा दाखवण्यात आली आहे.

मुंबईच्या चाळ संस्कृतीतून रॅपर्सच्या दुनियेत नावलौकिक मिळवणाऱ्या ‘डिव्हाइन’ म्हणजे विवियन फर्नांडिस आणि ‘रॅपर नॅझी’ म्हणजेच नावेद शेख यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटनांपासून ‘गली बॉय’च्या कथानकासाठी प्रेरणा घेण्यात आली आहे. चित्रपटातील रणवीर व आलियाच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

झोया अख्तरचा भाऊ फरहान अख्तरने ट्विट करत याविषयीची माहिती दिली. फरहान या चित्रपटाचा निर्मातासुद्धा आहे. ”९२व्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून गली बॉय या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे,” असं सांगत त्याने सर्वांचे आभार मानले. निर्माता-दिग्दर्शक करण जोहरनेही ट्विटरच्या माध्यमातून आनंद व्यक्त केला. ”माझा सर्वाधिक आवडता चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत उतरला आहे. झोया ही माझी आवडती दिग्दर्शिका आहे,” असं म्हणत त्याने शुभेच्छा दिल्या.

बॉक्स ऑफीसवर या चित्रपटाने २०० कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला होता.