गेल्या चार दशकात सिनेसृष्टीतली प्रत्येक व्यक्ती गुलझार यांच्याबरोबर काम करु इच्छिते. ३३ वर्षांपासून अनिल कपूरही या प्रयत्नात होते की ते गुलझार यांच्याबरोबर काम करतील. पण त्यांच्याही हाती निराशाच लागली. अनिल यांचा मुलगा हर्षवर्धनचे नशीब मात्र याबाबतीत चांगलंच निघालं. करिअरच्या पहिल्याच सिनेमात त्याला गुलझार यांच्याबरोबर काम करायची संधी मिळाली. आपल्याला नाही किमान मुलाला तरी ही संधी मिळाली म्हणून अनिल आता खूष आहेत. तर गुलझार यांना वाटतं की त्यांच्या एका पापाचे प्रायश्चित्य झाले.
अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धन ‘मिर्झिया’ या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. या सिनेमाची कथा गुलझार यांनी लिहीली आहे. अनिल कपूर गेली ३३ वर्ष या संधीच्या शोधात होते की त्यांना कधी तरी गुलझार यांच्यासोबत काम करायला मिळेल. पण ते अजूनपर्यंत शक्य झालं नाही. मुंबईमध्ये ‘मिर्झिया’च्या म्युझिक लॉन्चवेळी अनिल म्हणाले की, मी माझा पहिला सिनेमा ‘वो सात दिन’नंतर गेली ३३ वर्ष गुलझार यांना सांगत होतो की, माझ्यासाठी काही तरी लिहा आणि मला तुमच्या सिनेमात घ्या, माझ्यासाठी सिनेमा बनवा पण मला गुलझार यांनी संधीच दिली नाही. आज मला तुम्हाला धन्यवाद बोलायचे आहे की माझ्यासाठी नाही किमान माझ्या मुलासाठी तुम्ही सिनेमा लिहिला.
अनिल यांचे हे बोलणे ऐकून गुलझारही बोलले की, ‘काही पाप आणि त्या पापांचे प्रायश्चित अनेक पिढ्या चालत राहतं. मला माहित होतं की अनिल यावरुन मला नक्कीच टोमणा मारणार आणि त्याने सगळ्यांच्या समोर मला चांगलेच झोडले. गुलझार यांनी हेही सांगितले की काही मिनिटांपूर्वी मा हर्षला हेच सांगत होतो की तुझे बाबा हा विषय नक्की इथे काढणार आणि तसंच झालं.’