टिव्हीवरचा ‘कृष्ण’ म्हटलं की अजुनही सगळ्यांच्या डोळ्यासमोर येणारा गोंडस मराठी चेहरा म्हणजे स्वप्नील जोशी. मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता स्वप्नील आज त्याचा ३७वा वाढदिवस साजरा करत आहे. १८ ऑक्टोबर, १९७७ रोजी मुंबईत त्याचा जन्म झाला. वयाच्या नवव्या वर्षी त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. हिंदी – मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमधून त्याने अभिनय केला . विनोदी अभिनेता आणि स्टँडअप कॉमेडियन म्हणून त्याची ओळख आहे.
स्वप्नील जोशीने श्रीकृष्णाच्या रुपात पहिली मोठी भूमिका केली; नंतर तो विविध भूमिकांत दिसला, ‘कॉमेडी सर्कस’मधून त्याने सगळ्यांना हसवले. मात्र कधी अभिनय, कधी निवेदन; तर कधी परीक्षक या सगळ्या रूपात कायम राहिली ती त्याची “चॉकलेट बॉय’ची प्रतिमा.  ‘चेकमेट’ या २००८ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटामध्ये त्याने पहिल्यांदा प्रमुख भूमिका बजावली होती. ‘मुंबई – पुणे – मुंबई’ या चित्रपटातली त्याची भूमिका प्रेक्षकांना विशेष आवडली. त्यानंतर ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ ही मालिका आणि ‘मंगलाष्टक वन्स मोअर’ या चित्रपटामध्ये तो मुक्ता बर्वे बरोबर प्रेक्षकांसमोर आला. ‘दुनियादारी’ ने तर त्याच्या यशात विशेष भर घातली.  हारे काच की चुडियाँ, कॉमेडी सर्कस – १ आणि २ यासारख्या हिंदी मालिकांमधूनही तो प्रेक्षकांच्या भेटीला आला.
व्यावसायिक आयुष्यात तो ज्याप्रमाणे रोमॅण्टिक भूमिका करतो त्याचप्रमाणे तो वैयक्तिक आयुष्यातही तितकाच रोमॅण्टिक आहे. व्यवसायाने दंतवैद्य असलेल्या लीनाशी त्याने २०११ साली औरंगाबादमधील ताज हॉटेलमध्ये विवाह केला. आपल्या या आवडत्या कलाकाराला खालील प्रतिक्रिया बॉक्समध्ये शुभेच्छा द्यायला विसरू नका.