दमदार अभिनय कौशल्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण करणारा अभिनेता नवाजुद्दीन त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखला जातो. बॉलिवूड काम करता करता हॉलिवूडमध्ये झेप घेण्याचं स्वप्न बरेच कलाकार पाहत असतात. पण नवाजुद्दीनला बॉलिवूडमध्येच दर्जेदार काम करायचं आहे.

हॉलिवूडमध्ये काम करण्याविषयी नवाज म्हणतो, ”ज्याप्रकारे पाकिस्तानी कलाकारांमध्ये बॉलिवूडमध्ये काम करण्याची क्रेझ आहे, त्याचप्रकारे भारतीय कलाकारांमध्येही हॉलिवूडची फार क्रेझ आहे. पण मी त्या लोकांपैकी नाही. मलासुद्धा लोभ आहे, पण चांगलं काम करण्याचा आहे. जर मला भारतातच उत्तम काम मिळत असेल तर मी हॉलिवूडला का जाईन?”

आणखी वाचा : जेव्हा ब्रॅड पिट अंतराळवीर मित्राला विचारतो, भारताचा ‘विक्रम लँडर’ सापडला का? 

”तिथे काम करण्यासाठी मला एका एजंटची नेमणूक करावी लागेल आणि तिथे घडणाऱ्या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवावं लागेल. मला असं वाटतं की त्यांनी माझ्याकडे यावं. त्यांना जर माझ्यासोबत काम करायचं असेल तर त्यांनी मला विचारावं,” असं मत नवाजुद्दीनने मांडलं.

हॉलिवूडविषयी मत व्यक्त करताना नवाजुद्दीनने वेब विश्वातील आगामी काळातील आव्हानांबद्दलही वक्तव्य केलं. त्याविषयी तो पुढे म्हणाला, ”वेब विश्वात खूप चांगली कथानिर्मिती पाहायला मिळतेय आणि तिथे बरेच प्रयोगसुद्धा केले जातात. पण हे कधीपर्यंत राहील याची मला काळजी वाटते. प्रत्येक गोष्टीची सुरुवात खूप उत्तमरित्या होते, मात्र नंतर हळूहळू गोष्टी बदलत जातात. एखादा चित्रपट जर हिट होत असेल तर त्यानंतर तशाच प्रकारच्या चित्रपटांची रांग लागते. वेबवरसुद्धा हीच परिस्थिती येऊ नये याची मला काळजी आहे.”