प्रेमकथापट म्हटले की प्रेक्षकांना चित्रपटगृहात जाण्यापूर्वीच माहीत असते की किमान श्रवणीय गाणी, नायक-नायिकेची प्रेम व्यक्त करणारी गाणी आणि त्याचे चांगले चित्रीकरण, त्यांच्या प्रेमाला आडकाठी करणारा नायिकेचा नाहीतर नायकाचे वडील हे सगळं असणार आणि त्यावर मात करून नायक ‘हिरो’ बनणारच. परंतु, तरीसुद्धा किमान करमणूक आणि श्रवणीय गाण्यांसाठी प्रेक्षक चित्रपटगृहात जातो. प्रस्तुत ‘हिरो’ चित्रपट हा तर गाजलेल्या त्याच नावाच्या चित्रपटाचा रिमेक आहे म्हटल्यावर निश्चितच अपेक्षा उंचावतात. पण प्रेक्षकांच्या या अपेक्षा फोल ठरवत एक फसलेला चित्रपट पाहावा लागतो. त्यामुळे खरे तर हा कसला हिरो, हा तर ‘झिरो’ असे म्हणण्याची वेळ प्रेक्षकांवर येते.
प्रेमकथापट म्हटले की सर्वसाधारणपणे प्रेक्षकांना निदान श्रवणीय गाणी ऐकायला, पाहायला मिळतील अशी अपेक्षा असते. ८०-९० च्या दशकातही प्रेमकथापट बहुतांशी गाण्यांवरच गर्दी खेचतात हे ठरीव गणित होतेच. मात्र या चित्रपटात एखादेच गाणे बरे वाटते. चकाचक चित्रीकरण हीच काय ती चित्रपटाची जमेची बाजू म्हणता येईल बाकी सगळा आनंदीआनंद. प्रेमकथापटांद्वारे नवीन नायक-नायिकेची जोडी प्रेक्षकांसमोर आणण्याचा आपल्या हिंदी चित्रपटांचा शिरस्ता असतो. त्याप्रमाणे या चित्रपटातही सूरज पांचोली-अथिया शेट्टी ही स्टार कलावंतांच्या अपत्यांची जोडी असली तरी सूरज पांचोली कुठल्याही कोनातून पाहिले तरी तो गुंड वाटत नाही आणि अथिया शेट्टी कुठल्याही कोनातून गोड दिसलेली नाही. एकुणात हा चित्रपट पाहताना जॅकी श्रॉफने रंगविलेला गुंड आणि मीनाक्षी शेषाद्रीने रंगविलेली नायिकाच पुन्हापुन्हा आठवते आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीताच्या चाली आणि त्यामुळे श्रवणीय गाणीच आज पुन्हा आठवतात. मूळ चित्रपटाची आठवण होण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे मूळ चित्रपटाच्या कथेचा ढाचा तसाच ठेवण्यात आला असून कथानकात आजच्या काळानुरूप फार कमी बदल केले आहेत. प्रेमकथेतील संघर्षांच्या प्रसंगांची हवाच दिग्दर्शकाने या चित्रपटातून काढून घेतली आहे. आपण तद्दनपणा करीत नाही असे दाखविण्याचा प्रयत्न करतानाही लेखक-दिग्दर्शकांनी ‘फिल्मीगिरी’ अखंड चित्रपटभर केली आहे.
नवोदित नायकाचा रुपेरी पडद्यावरचा पहिला प्रवेश दाखविण्यासाठी हिंदी सिनेमावाले नेहमीच काहीतरी क्लृप्ती करून नायकाला प्रेक्षकांच्या नजरेत मोठे करण्याचा प्रयत्न करत आले आहेत. या चित्रपटात सूरज पांचोलीच्या व्यक्तिरेखेचे नाव सूरज हेच ठेवले आहे. यामागे त्याच्या पूर्वप्रतापांवरून प्रेक्षकांना ओळख पटावी हा सुप्त उद्देश चित्रपटकर्त्यांचा आहे हे मान्य केले तरी मूळ कथासूत्र रिमेकमध्ये सारखे ठेवूनही प्रसंग, कथानकाची रचना यात आजच्या काळानुरूप बदल करणे अपेक्षित असते. आणखी महत्त्वाचे म्हणजे प्रेमकथा पाहताना प्रेक्षकाला उत्कंठा वाटेल अशी नायक-नायिकांच्या तीव्र प्रेमप्रसंगांचा या चित्रपटात संपूर्ण अभाव आहे. प्रेमी जिवांची तीव्रता या चित्रपटात संपूर्णपणे हरवून गेली आहे. त्यामुळे फिल्मीगिरीवर चित्रपटकर्त्यांनी सगळा भर दिला आहे. नायक-नायिकेची ताटातूट झाल्यानंतर त्यांना जाणवणारी भावनिक कालवाकालव, अनपेक्षित धक्के, कथानकाला अनपेक्षित वळण देण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने अजिबात करू नये हे खटकते.
अभिनयाच्या बाबतीत फारसे काही न बोलले तरच बरे. नाही म्हणायला पडद्यावर अजिबात गुंड न वाटणारा नायक सूरज पांचोलीने साकारला असला तरी बरा अभिनय त्याने केला आहे. अथिया शेट्टी मात्र सुमार म्हणावी लागेल. एखाद दोन प्रसंगांत ती बरी दिसली आहे. आपण अभिनय करतोय तो बरा होतोय की नाही या द्विधा मन:स्थितीत अथिया शेट्टी आणि सूरज पांचोली पडद्यावर दिसतात. रिमेक पाहिल्यावर नेहमीप्रमाणे हा चित्रपटही मूळ चित्रपटाच्या तुलनेत अगदीच फिका वाटणे साहजिक आहे.

 

हीरो
निर्माता – सलमान खान, सुभाष घई
दिग्दर्शक – निखिल अडवाणी
लेखक – निखिल अडवाणी, उमेश बिष्ट
संगीत – अमाल मलिक, मीट ब्रॉस अंजान, सचिन-जिगर
कलावंत – सूरज पांचोली, अथिया शेट्टी, तिग्मांशू धुलिया, शरद केळकर, कादर खान, आदित्य पांचोली, सक्थिवेल, इम्रान हसनी