News Flash

मातृत्वाची अमर कहाणी

हिरकणीची गोष्ट पाठय़पुस्तकातून अनेकांनी वाचलेली आहे.

|| चित्र रंजन : रेश्मा राईकवार

हिरकणी : – सगळे मार्ग बंद झाल्यावरही बाळाच्या ओढीने जिवावर उदार होऊन काळाकभिन्न, खोल असा कडा उतरून जाणाऱ्या हिरकणीची गोष्ट ही एकाच वेळी अंगावर काटा आणणारी आहे. मात्र, त्याच वेळी ती मातृत्वाच्या भावनेने ओथंबलेली आहे. आपल्या बाळासाठी सगळी संकटे सोसून पार जाणाऱ्या प्रत्येक आईत ही हिरकणी दिसावी, अशी या कथेची ताकद आहे. त्यामुळे रुपेरी पडद्यावर हिरकणीच्या अतुलनीय पराक्रमाची गोष्ट पाहायला मिळणार म्हटल्यावर साहजिकच हिरकणीच्या या अचाट पराक्रमातील थरार आणि तिचं तिच्या बाळावरचं अतूट प्रेम या दोन्ही गोष्टी प्राधान्याने डोळ्यासमोर येतात. प्रसाद ओक दिग्दर्शित ‘हिरकणी’ या चित्रपटातून आईच्या प्रेमाची तीच कथा पहिल्यांदा पडद्यावर जिवंत झाली आहे.

हिरकणीची गोष्ट पाठय़पुस्तकातून अनेकांनी वाचलेली आहे. ज्या कडय़ावर फक्त खालून वारा वर येतो आणि पाणी खाली जाऊ शकते, असे वर्णन केले जाते तो कडा हिरकणी कसा उतरून गेली असेल, याची कल्पना करूनच चित्रपटाची कथा प्रताप गंगावणे यांनी लिहिली आहे. चित्रपटाची पटकथा आणि संवादलेखन हे चिन्मय मांडलेकर यांचे आहे. त्यामुळे रायगडवाडीच्या या हिराची गोष्ट या चित्रपटात थोडी सविस्तर पाहायला मिळते. हिरा गवळण आणि तिचा नवरा जिवा यांच्या कथेने चित्रपटाची सुरुवात होते. शिवाजी महाराजांनी उभारलेल्या स्वराज्याचे रक्षण करणारे बहिर्जी नाईक आणि त्यांच्या हाताखाली काम करणारा शूर मावळा जिवा एकीकडे, तर दुसरीकडे या सगळ्यापासून दूर असलेली, महाराजांना देव मानणारी आणि त्यांची एक झलक पाहायला मिळावी यासाठी आसुसलेली हिरा ही अत्यंत साधी-सरळ गृहिणी आहे. छोटय़ा-छोटय़ा गोष्टींनाही घाबरणाऱ्या या हिरामध्ये इतका अभेद्य कडा उतरून जाण्याचे धैर्य कुठून आले असेल, ही अजूनही नवल करायला लावणारी गोष्ट आहे. मात्र इथे जिवा आणि हिराचा संसार, त्यांचे बहरत गेलेले नाते, मग बाळाचा जन्म आणि त्याच वेळी जंजिऱ्याच्या टेहळणी मोहिमेवर निघालेला जिवा ही सगळी कथा विस्ताराने येते.

वर म्हटले तसे ही कथा आबालवृद्धांना आवडणारी आहे, हिरकणीच्या शौर्याची ही कथा ऐकताना आपण भान हरपून जातो. मात्र चित्रपटरूपात साकारताना त्या कथेचा मुख्य गाभा हा थोडकाच असल्याचे लक्षात येते. त्यामुळे एक तर हिरकणी कडा कशी उतरली असेल, हा यातला मुख्य औत्सुक्याचा भाग आहे. मुळात, ते दाखवताना हा कडा जर कथेच्या केंद्रस्थानी असता तर तो अधिक भिनला असता. त्याऐवजी पूर्वार्धात हिराचे वैयक्तिक आयुष्य आणि त्याहीपेक्षा हिरा आणि जिवाची प्रेमकथा प्रामुख्याने पाहायला मिळते. त्यातल्या त्यात गडावरून धडधडणारी तोफ आणि महाराजांचे निसटते दर्शन, हिराच्या घरासमोर दिसणारा रायगड या छोटय़ा-छोटय़ा उल्लेखातून हिरकरणी रायगडाशी जोडली गेली आहे हे दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शक म्हणून प्रसाद ओक यांनी केला आहे. व्हीएफएक्सच्या माध्यमातून हिरकणीचा गड उतरण्याचा प्रसंग जिवंत झाला असला तरी तो आणखी प्रभावीपणे समोर यायला हवा होता, असे वाटत राहते. हिरकणीच्या भूमिके ला न्याय देण्याचा प्रयत्न अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने केला आहे. बहिर्जीच्या अगदी क्षणभराच्या भूमिकेत स्पष्टपणे चेहरा समोर न येताही मकरंद देशपांडे यांनी त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली आहे. तर तुलनेने छोटी असली तरी जिवाच्या भूमिकेत अभिनेता अमित खेडेकर भाव खाऊन गेला आहे.

चित्रपटातील गाणी आणि संगीताचा विशेष उल्लेख करायला हवा. चित्रपटात एकूण तीन गाणी आहेत. तिन्ही गाण्यांना अमितराज यांनी संगीत दिले असून संजय कृष्णाजी पाटील आणि संदीप खरे यांनी ही गीते लिहिली आहेत. गाणी श्रवणीय झाली असून चित्रपट संपल्यानंतर आशा भोसले यांच्या आवाजातील आईची आरतीही तितकीच श्रवणीय आहे. एका ऐतिहासिक पराक्रमाची, आईच्या अतुलनीय प्रेमाची गाथा सांगणारा हा चित्रपट नेहमीच्या चित्रपटांच्या भाऊगर्दीत वेगळा ठरतोच.

 दिग्दर्शक – प्रसाद ओक

 कलाकार – सोनाली कुलकर्णी, अमित खेडेकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2019 2:08 am

Web Title: hirkani movie review akp 94
Next Stories
1 हसण्याशीही वाकडे!
2 … यापेक्षा दुर्दैव ते काय; प्रसाद ओक याचा संतप्त सवाल
3 राणादाने कुस्ती सोडली, दिसणार नव्या रूपात
Just Now!
X