अभिनेता सलमान खान याच्याविरोधात नव्या आरोपाअंतर्गत नव्याने चालविण्यात येणाऱ्या खटल्यामध्ये मंगळवारी साक्षीदाराने आपली साक्ष फिरवली. घटनेच्या रात्री सलमान चालकाच्या आसनाच्या बाजूने गाडीतून खाली उतरला आणि त्याने तेथून पळ काढला, असे आपण कधीच पोलिसांना सांगितले नसल्याचे सांगत या साक्षीदाराने पोलीस जबाबावरून ‘घूमजाव’ केले.
सचिन कदम असे या साक्षीदाराचे नाव असून तो ‘नीलसागर’ या हॉटेलचा (जेथे अपघात झाला त्या अमेरिकन बेकरीसमोरील) सुरक्षारक्षक आहे. पोलिसांनी आपला चुकीचा जबाब नोंदविल्याचे मंगळवारी त्याने साक्षीदरम्यान न्यायालयाला सांगितले. सलमान चालकाच्या आसनाच्या बाजूने गाडीतून खाली उतरला आणि त्याने तेथून पळ काढला, असे पोलिसांना आपण सांगितले नव्हते. पोलिसांनी ते चुकीचे लिहिलेले असल्याचे कदम याने न्यायालयाला सांगितले. पोलिसांच्या दाव्यानुसार मात्र कदम याने पोलीस जबाब देताना सलमानला आपण गाडीतून खाली उतरताना आणि तेही चालकाच्या आसनाच्या बाजूने खाली उतरताना पाहिल्याचे आणि तेथून पळून जाताना पाहिल्याचे सांगितले होते.
परंतु आपण पोलिसांना एक मोठय़ा गाडीने दुकानाला धडक दिल्याचे सांगितले होते, असा दावा कदम यांनी मंगळवारच्या सुनावणीत केला. विशेष म्हणजे पोलिसांनी त्याचा ‘खोटा जबाब’ नोंदवलाच का, हे मात्र तो सांगू शकला नाही. कदमने जबाब फिरवल्यानंतर सरकारी वकिलांनी त्याला फितूर जाहीर करण्याची मागणी न्यायालयाकडे केली. मात्र न्यायालयाने अद्याप त्यावर निर्णय दिलेला नाही.

‘गाडीखालून काढताना सलमान तिथे होता’..
मोहम्मद शेख या आणखी जखमीची साक्ष मंगळवारी नोंदविण्यात आली. या साक्षीदाराने मात्र न्यायालयात उपस्थित सलमानला ओळखले. आपल्याला गाडीखालून बाहेर काढण्यात आल्यानंतर सलमानला आपण घटनास्थळी उभे असल्याचे पाहिले असे शेखने न्यायालयाला सांगितले.