|| पंकज भोसले

नायकाला दुर्धर आजार चित्रपटाच्या आरंभीच दाखविण्यात आला की सिनेमा आयुष्याच्या सुंदरतेविषयीचे सरधोपट पाठ पुरवणारा, भावूक प्रसंगांचे आणि रडारडीस उद्युक्त करणाऱ्या संवादांचे एकामागून एक आविष्कार घडवीत राहणार अशी धारणा हिंदी चित्रपटांनी भारतीय मनांत पक्की केली आहे. तरी जगभरातील अशा प्रकारचे चित्रपट जीवनज्ञानाची अतिरिक्त मात्रा उगाळण्यास थकत नाहीत. अन् प्र्रेक्षकही त्यातल्या नेहमीच्या कथाकसरतीला वाखाणण्यापासून चुकत नाहीत.

यातही दोन प्रकारचे चित्रपट असतात. आयुष्यभर केलेल्या ‘वाल्यागिरी’ची उपरती खरोखरच्या आजारपणात आल्यानंतर उरलेले दिवस ‘वाल्मीकीगिरी’चा विडा उचलणाऱ्या प्रमुख व्यक्तिरेखांचे चित्रपट किंवा डॉक्टर अथवा रुग्णालय चुकीने मृत्यू अटळतेची खोटी वार्ता नायक/नायिकेला मिळाल्यानंतर त्याच्या आयुष्यात झालेल्या खऱ्या चांगुलपणाची कथा विणणारे चित्रपट. पण दोन्हींमध्ये उपदेश, संदेशप्रसार, भावूक कढ यांचा पुरेपूर अर्क ओतलेला असतो. (पूर्वी तर हिंदी चित्रपटांच्या क्लायमेक्समध्ये ईश्वरी-डॉक्टरी-किंवा नायिकेने गायलेल्या गाण्याच्या जादूने नायक ऑपरेशन थिएटरमध्ये मृत्युकाठावरून परतूनही येत असे.) पण या सरधोपटपणापलीकडे नवे काही तरी शोधणारे चित्रपट देशभरामध्ये आले आहेत. त्यात आवर्जून पाहण्यासारखे चित्रपट म्हणजे ‘हेन्री पूल इज हिअर’, ‘मी अ‍ॅण्ड अर्ल अ‍ॅण्ड डायिंग गर्ल’, आणि ‘द फॉल्ट इन अवर स्टार्स’. पैकी पहिला हा मृत्यू आणि देव संकल्पना यांच्याविषयी तिरकस कहाणी सांगणारा तर इतर दोन बेस्ट सेलर यंग अ‍ॅडल्ट कादंबऱ्यांपासून तयार झालेले चित्रपट आहेत. या सिनेमात मृत्यू स्वीकारलेल्या व्यक्तिरेखांकडून प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष उपदेशामृताचा डोस अंगावर येत नाही.

या प्रकारातील दोन ताजे चित्रपट सध्या उपलब्ध आहेत. पहिला दिग्दर्शक वेन रॉबर्ट्स याचा जॉनी डेप अभिनित ‘द प्रोफेसर’ आणि दुसरा डय़ुप्लास ब्रदर्स प्रॉडक्शनचा दिग्दर्शक अ‍ॅलेक्स लेहमनने तयार केलेला ‘पॅडलटन’. पैकी न परतीच्या वाटेवरून सूर गवसलेल्या जॉनी डेपच्या खणखणीत अभिनयाखेरीज ‘द प्रोफेसर’ अनेक पातळीवर निराशा करतो. अपारंपरिक जागांवर वर्ग भरवत ‘आयुष्यात काय करायला हवे’ याची जंत्री आपल्या विद्यार्थ्यांसमोर सादर करणाऱ्या या प्राध्यापकाची दु:खभरी दास्तान मन:स्पर्श करण्यापासून कायम हुकलेली राहते. तर मृत्यूची वर्दी मिळाल्यानंतर पॅडलटनमधील दोन शेजाऱ्यांचे बदललेले मैत्रीपर्व प्रेक्षकाला जागेवर जखडून ठेवते.

‘पॅडलटन’च्यी आरंभीच रुग्णालयामध्ये मायकेल (मार्क डय़ुप्लास) याला उदराच्या कर्करोगाची माहिती मिळते. त्याला रुग्णालयात घेऊन आलेला शेजारी अ‍ॅण्डी (रे रोमानो) डॉक्टर सांगत असलेल्या वृत्ताने थोडा चक्रावून जातो. प्रचंड भाषिक कसरती करीत चित्रपटाचे दाखले देत तो आजार कधीही न बरा होणारा असल्याचे डॉक्टरकडून वदवून घेण्यात यशस्वी होतो. पुढील भाग मायकेलच्या आयुष्यासाठी दु:खप्रद बनण्याऐवजी सामान्य दिवसांसारखाच राहतो. दुय्यम प्रतीच्या खर्डेघाशीने युक्त नोकऱ्या करून आडगावातील घरांमध्ये एकांत आयुष्य जगणाऱ्या अ‍ॅण्डी आणि मायकेल यांच्या सहदिनक्रमातील बाबी चित्रपटात दिसायला लागतात. दोघांची घरे एकमेकांना लागून आणि दोघेही कुटुंबहीन असल्याने एकमेकांच्या सान्निध्यात आपले उतारवय आनंदाने जगताना दिसतात. ते सकाळी ‘पॅडलटन’ नावाचा त्यांनीच तयार केलेले खेळ खेळतात. दिवसा आपापल्या कामाला जातात. संध्याकाळी व्हीएचएसवर एकच कुंग-फू चित्रपटाचा आस्वाद घेतात. सहभोजन आणि पेयपान करून रात्री आपापल्या घरी निद्राधीन होतात. मायकेलच्या आजाराच्या माहितीपूर्वीपासून चाललेला हा शिरस्ता जराही बदलत नाही. एका निर्णायक क्षणी मायकेल आजाराचे स्वरूप भीषण होण्याआधीच जीवन संपविण्याच्या निर्णयावर येतो. नाखुशीने या प्रक्रियेत मायकेलला मदत करण्यासाठी अ‍ॅण्डी तयार होतो.

मृत्यूला कवटाळण्यासाठी मायकेलला विशिष्ट औषधांची गरज असते. ती आणण्यासाठी सहा तासांचा मोठय़ा शहरातील प्रवास मायकेल आणि अ‍ॅण्डी एकत्र करतात, हा चित्रपटाचा प्रमुख भाग. यात रोडट्रिप असली, तरी चित्रपट रोडमूव्ही नाही. यातील आणखी एक गंमत ही की, जीवनदृष्टी देण्याचा, भावूक करण्याचा हृदयस्पर्शी संवादांचा प्रसंग चुकूनही आणण्याचा प्रयत्न करण्यात आला नाही. स्वनिर्मित पॅडलटन हा खेळ खेळून, रात्रीचे सहभोजन करून आणि कुंग-फू सिनेमांचे समवेड राखूनही एकमेकांविषयी जुजबी माहिती असलेले हे शेजारी माफक माणुसकीतून एकत्र आलेले असतात. या प्रवासामुळे त्यांच्या मैत्रीपर्वात बहर येते. अतिशय सहससाध्य गोष्टी पहिल्यांदाच करून त्यातला आनंद शोधताना त्यांच्यातील संवाद आणखी चमकदार होतात.

मृत्यूविषयक सिनेमाला अत्यंत साध्या घटनांचे अस्तर लावत दिग्दर्शकाने प्रमुख व्यक्तिरेखांची त्याकडे जाणारी वाटचाल अधिकाधिक रंजक करण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्वायुष्याच्या माफक स्मृतींचे ओझे नसलेल्या आणि भविष्याविषयी अवास्तव कल्पना न बाळगणाऱ्या या व्यक्तिरेखा प्रेक्षकांसाठी त्यांच्या याच वैशिष्टय़ामुळे अविस्मरणीय बनू शकतात. चित्रपटातून आयुष्याच्या सौंदर्याचे सरधोपट संदेश पाहण्यास सरावलेल्या सर्वासाठी ‘पॅडलटन’ चांगल्या अर्थाने चवबदल ठरू शकेल.