|| पंकज भोसले

‘‘रोड मूव्ही’ या चित्रप्रकाराचे टप्पे ठरलेले असतात. तरीही नायक किंवा नायिकेचा बिथरलेल्या स्थितीतून प्रवासारंभ- प्रवासातील विविधांगी माणसांच्या आणि जगण्याच्या दर्शनातून चित्रपटातील प्रमुख व्यक्तीला आपल्या आयुष्याविषयी झालेली उपरती- प्रवासअंतापर्यंत मन आणि आयुष्य सावरलेल्या अवस्थेपर्यंत गेलेल्या व्यक्तिरेखांतून प्रेक्षकाला आनंदाश्रूंची भेट वगैरे देणारा रोड मूव्ही चित्रप्रकार गेल्या दोन दशकांत विविध प्रकारे विकसित झाला आहे. कुटुंब एकोप्याची त्रांगडी गोष्ट सांगणारा ‘लिटिल मिस सनशाइन’, आत्महत्या केल्यानंतरच्या भकास अडकलेल्या जगातील गंमत मांडणारा ‘रिस्टकटर्स: ए लव्ह स्टोरी’, उरलेल्या थोडय़ा आयुष्यात मानवी जीवनाचा अर्थ शोधण्यास निघालेल्या नायकाला दाखविणारा ‘वन वीक’ अशी अलीकडच्या दशकातील या चित्रप्रकारातील ज्ञात-अज्ञात खूप उदाहरणे सांगता येतील. आपल्याकडे ‘दिल चाहता है’नंतरच्या दीड दशकात मोजके तरी उत्तम प्रवासपट आले. ‘पिकू’, ‘फाइंडिंग फॅनी’, ‘हायवे’, ‘एनएच-टेन’, ‘जिंदगी ना मिलेगी  दोबारा’ वगैरे सिनेमांना ‘वेगळ्या धाटणी’चे  वगैरे म्हणण्यास धजावणे हे या चित्रप्रकारामुळे शक्य होते.

इटालियन दिग्दर्शक पाओलो विरझी यांनी ‘लेझर सिकर’ या कादंबरीवरून तयार केलेला त्याच नावाचा चित्रपट रोड मूव्ही चित्रप्रकारातील पारंपरिक टप्प्यांना मोडत पठडीबाहेरचा प्रेमप्रवास त्याच्या प्रेक्षकाला घडवितो. चित्रपट इटली-फ्रान्सची संयुक्त निर्मिती असला, तरी त्याचे सारे कथानक घडते ते अमेरिकेत. यातले नायक-नायिका प्रवासक्षम वयाच्या पलीकडे साठी-सत्तरी ओलांडलेले असल्यामुळे त्यांच्यात नवी उपरती किंवा साक्षात्कार होण्याची शक्यता कमी. त्यातही नायकाची सातत्याने स्मृतिभ्रंश होणारी स्थिती हा प्रवास कितपत यशस्वी होईल, याविषयी सुरुवातीपासूनच शंका निर्माण करणारा. असे असतानाही हा प्रवास गमतीदार वळणांनी जुळायला लागतो.

चित्रपटाच्या सुरुवातीलाच वयोवृद्ध जॉन (डोनाल्ड सदरलॅण्ड) आणि एला (हेलन मिरन) आपल्या दोन वयाने मोठाल्या मुलांना न सांगता ‘लेझर सिकर’ या (आरव्ही) गाडीला घेऊन दूरच्या प्रवासास निघून जातात. हा दूरचा प्रवास करण्याची क्षमता नसल्यामुळे दोन्ही मुलांना त्यांची काळजी वाटते. ते शहरामध्ये शोध घेण्यापूर्वीच जॉन याने प्रवासाचा न परतीचा पल्ला गाठलेला असतो. चाळीसेक वर्षे निगुतीने संसार करणाऱ्या या जोडप्याने आयुष्यभर आपल्या मुलांसाठी राबताना स्वत:च्या आनंदासाठी फार काही केलेले नसते. कुण्या एके काळी इंग्रजी साहित्याचा प्राध्यापक असलेल्या जॉनचे जगविख्यात साहित्यिक हेमिंग्वेचे घर पाहण्याचे स्वप्नही आयुष्यभर तसेच राहिलेले असते. करारी एलाच्या पुढाकाराने स्मृती अधिकाधिक हरवत चाललेल्या जॉनचे हे हेमिंग्वे घरदर्शनाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बोस्टनवरून हजारो मैलांचा प्रवास सुरू होतो.

या संपूर्ण प्रवासात पारंपरिक रोड मूव्हीच्या बऱ्याचशा घटकांना वगळण्याचा प्रयत्न केलेला आढळतो. या व्यक्तिरेखा मुळातच कृश आणि मरणाकडे कललेल्या असल्याने त्यांची आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी फार वेगळी असते. हेमिंग्वे आणि साहित्याविषयी अविरत बोलणारा जॉन थोडय़ा थोडय़ा कालावधीनंतर आपल्या प्रवासाबाबत विसरताना दिसतो. आपण कुठे आहोत आणि एला कोण आहे, याची प्रयत्नांती आठवण करून दिल्यानंतर तिच्यासोबत पुन्हा प्रवास सुरू ठेवतो. यात एका ठिकाणी गाडीत इंधन भरल्यानंतर बाहेर असलेल्या एलाला सोबत घेऊन जायचेच विसरतो आणि एकटय़ाने आपण प्रवास का करीत आहोत, याबाबत गोंधळतो.

हा प्रवास हेमिंग्वेच्या घराला पाहण्यासाठी असला, तरी दोघांच्या एकमेकांविषयी असलेल्या नात्याचा, आठवणींचा आणि अवलंबित्वाचा शोध घेतो. या प्रवासात भेटणाऱ्या माणसांना दोन्ही वृद्धांशी बोलताना त्यांच्यापासून लांब पळावे, अशी भावना होत असली, तरी या दोघांच्या एकमेकांप्रति इतक्या वर्षांत तयार झालेल्या प्रेम-रागाच्या विविध अवस्थांचे दर्शन घडविण्यात आले आहे.

या प्रवासातच जॉन स्मृतिभ्रंशावर मात करीत चाळीस-पन्नास वर्षांपूर्वीच्या एलाच्या प्रियकरावरून उणीदुणी काढू लागतो आणि स्मृतिभ्रंशाच्या झटक्यातच स्वत:च्या अनेक वर्षांपूर्वीच्या विवाहबाह्य़ संबंधांची  कबुलीही एलाकडे देऊन टाकतो. आयुष्यभर डेमोक्रॅटिक पक्षाचा समर्थक असल्याचे विसरून ट्रम्प यांच्या समर्थनार्थ निघालेल्या रॅलीत कट्टर रिपब्लिकन बनून जातो.

पण अपवादात्मक परिस्थितीत दोघे एकमेकांचा तीव्र राग करतात, तितकेच एकमेकांवर खरेखुरे प्रेमही करतात. प्रवासात त्यांची गाडी बंद पडते, भुरटय़ा चोरांना ते बंदुकीच्या साहाय्याने पळवितात आणि आयुष्यभर काढलेल्या छायाचित्रांना प्रोजेक्टरच्या साहाय्याने पाहत दररोजची संध्याकाळ एखाद्या तळ्याकाठी स्मृतिमग्न बनवितात.

या दाम्पत्याचा उतारवयातील प्रवासाचा निर्णयच फार धाडसी आहे. त्यापुढे येणाऱ्या तुरळक अडथळ्यांना त्यांच्या लेखी काहीच किंमत नाही. या चित्रपटात स्मृतिभ्रंश, वृद्धत्वामुळे मानवी शरीराची होणारी पडझड यांचे बरेच बारकावे टिपलेले आहेत. हे वृद्ध कुरबुरे असले, तरी रडके नाहीत. तरुणांनाही लाजविणारी त्यांच्यातील प्रवासाची ऊर्मी आहे. प्रवासाबाबतच्या, साहित्याबाबतच्या आणि आयुष्याबाबतच्या त्यांच्या चर्चा कुतूहलपूर्ण आहेत.  वृद्ध असलेल्या या तरुण मनांचा हा प्रवास ‘प्रेरणादायी’, ‘उत्साहवर्धक’ गटामध्ये मोडणारा नाही. तरीही डोनाल्ड सदरलॅण्ड आणि हेलन मिरन यांनी चित्रपटात वठविलेल्या अजोड नात्याची ही गोष्ट चांगला अनुभव नक्कीच देऊ शकते.