मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अधिराज्य गाजविणाऱ्या अभिनेता अशोक सराफ यांची प्रमुख भूमिका असलेला ‘हृदयात समथिंग समथिंग’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसापूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून या ट्रेलरला प्रेक्षकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं. यानंतर आता चित्रपटातील पहिलंवहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

प्रवीण राजन कारळे दिग्दर्शित ‘हृदयात समथिंग समथिंग’ या चित्रपटातील चंद्रमुखी हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून हे गाणं चित्रपटातील कलाकारांनी गायलं आहे. अशोक सराफ, अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण आणि प्रियांका यादव या कलाकारांनी हे गाणं गायलं असून संगीतकार सुकुमार दत्ता यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. ‘चंद्रमुखी’ हे गाणं लग्नातील हळदी सोहळ्यावर चित्रीकरण्यात आलं आहे.

‘यापूर्वी ‘सगे-सोयरे’ आणि ‘कळत-नकळत’ या चित्रपटांमधून मी गाणे गायले आहे. त्यामुळे हे गाणे रेकॉर्ड होताना त्या गाण्यांचा रेकॉर्डिंगचा अनुभव गाठीशी होताच, शिवाय हे हळदीचे गाणे असले तरी मिश्किल बाजाचे असल्याने ते आमच्या आवाजात शोभत आहे,’असं अशोक सराफ यांनी सांगितलं.

पिरॅमिड फिल्म्स हाऊस प्रस्तूत विनोदकुमार जैन, शैलेंद्र पारख, स्वप्नील चव्हाण, आणि अतुल गुगळे यांची निर्मिती असलेला हा चित्रपट ५ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.