शब्दांशिवाय सिनेमा किती प्रभावी आणि उत्कृष्ट असू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे चार्ली चॅप्लिनचे सिनेमे. जगातल्या या सर्वात लोकप्रिय विनोदवीराची आज १३१ वी जयंती. आपल्या आईसाठी वयाच्या पाचव्या वर्षी त्याने पहिल्यांदा स्टेजवर परफॉर्म केलं होतं. अचानक तब्येत बिघडल्याने त्याची आई एका कार्यक्रमात परफॉर्म करू शकत नव्हती, तेव्हा ऐनवेळी चार्लीने तीची भूमिका साकारली होती. येथून सुरु झालेला चार्लीचा प्रवास नंतर इतिहासांच्या पानांमध्ये लिहिला गेला. मात्र जगाला पोट धरून हसायला भाग पाडणारा चार्ली वैयक्तिक आयुष्यात क्वचितच हसायचा.

चॅप्लिनचं वास्तव जीवन आणि सिनेमातील चॅप्लिन हे पूर्णपणे वेगळे होते. तरी आजही चार्ली अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत आहे. अनेकांना केवळ त्याच्या फोटोकडे पाहिले तरी हसू येते आणि हेच हसू त्यांना जगण्याची उमेद देते. बॉलिवूडमधील असाच एक बडा कलाकार चार्लीचा मोठा चाहता आहे. या चाहत्याचे नाव आहे बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार. अक्षय कुमार चार्लीचा फोटो कायम आपल्या पाकिटात ठेवतो. काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमामध्ये अक्षयनेच यासंदर्भात माहिती दिली होती.

चार्लीच्या फोटोकडे पाहून मला कठीण प्रसंगी प्रेरणा मिळते असं अक्षयने एका कार्यक्रमामध्ये सांगितले होते. ‘माझ्या पाकिटात नेहमीच प्रसिद्ध विनोदवीर चार्ली चॅपलिन यांचा फोटो असतो. कधीही आयुष्यात कठीण प्रसंग आला की मला चार्ली यांचे विचार आठवतात. त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर माझा विश्वास आहे. ते आणि त्यांचे सिनेमे हे माझ्यासह अनेकांसाठी प्रेरणादायी आहेत. एवढा मोठा कलाकार असूनही त्यांची नम्रता खूप काही शिकवून जाते.’, असे अक्षय चार्ली चॅप्लिनबद्दल बोलताना म्हणाला होता. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या कार्यक्रमाच्या नवव्या सिझनमधील पहिल्या शो दरम्यान अक्षयने हे मत व्यक्त केले होते.

अ‍ॅक्शन हिरो म्हणून बॉलिवूडमध्ये प्रवेश करणाऱ्या अक्षय हळूहळू विनोदी भूमिकांकडे वळला आणि आता तो समाजिक संदेश देणारे सिनेमा करणारा हिरो म्हणून ओळखला जातो. आपल्या या प्रवासामध्ये चार्लीची प्रेरणा मिळाल्याचे तो सांगतो.