श्रीदेवी यांचे पार्थिव आज मुंबईत आणले जाणार आहे. शनिवारी श्रीदेवी यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला त्यांचा मृत्यू कार्डिअॅक अरेस्टमुळे झाल्याचे वृत्त समोर आले. मात्र फॉरेन्सिक अहवाल समोर येताच श्रीदेवी यांचा मृत्यू अपघाताने बाथटबमध्ये पडल्याने बुडून झाला असे समोर आले. त्यानंतर भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी श्रीदेवी यांचा मृत्यू ही हत्या तर नाही ना? असा संशय व्यक्त केला. तसेच दाऊद इब्राहिम आणि सिने अभिनेत्रींचे अनैतिक संबंध लक्षात घेता त्याकडेही लक्ष द्यावे लागेल असेही वक्तव्य केले. मात्र सपा नेते अमर सिंह यांनी मीडियाने चुकीचे आरोप करू नयेत असे म्हटले आहे. तसेच सुब्रमण्यम स्वामी यांनाही मी विनंती करतो की श्रीदेवी यांच्या मृत्यूनंतर चुकीचे आरोप करू नका. श्रीदेवी यांचा मृत्यू ही अकस्मात घडलेली घटना आहे. याबाबत बोलताना किंवा बातमी देताना भान बाळगले पाहिजे असेही सिंह यांनी म्हटले आहे.

सोमवारी श्रीदेवी यांचा मृत्यू बाथटबमधील पाण्यात बुडून झाला असा फॉरेन्सिक अहवाल आला. त्यांच्या शरीरात मद्याचे अंश आढळल्याचेही अहवालात म्हटले गेले. त्यानंतरही अमर सिंह यांनी श्रीदेवी या हार्ड ड्रिंकर नव्हत्या असे म्हटले होते. आता सुब्रमण्यम स्वामी यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा अमर सिंह यांनी चुकीचे आरोप करू नका अशी विनंती केली आहे.