कोण एक व्यक्ती आपल्याला आवडत असेल तर त्या व्यक्तीवर प्रभाव पाडण्साठी आपण निर्विवादपणे काहीतरी वाटा शोधतोच. यामध्ये बी- टाऊनचे कलाकार मंडळीही मागे नाहीत. मुख्य म्हणजे अभिनेता सलमान खानने याविषयीचा एक अतिशय महत्त्वाचा खुलासाही केला आहे. अनेक तरुणींच्या मनावर राज्य करणाऱ्या सलमानने आपण शिक्षिकांसोबतही फ्लर्ट करत असल्याची कबुली दिली.

आपल्या शाळेत शिक्षिकांच्याच प्रेमात पडण्याविषयीचा प्रश्न ज्यावेळी विचारण्यात आला तेव्हा त्याने ही गोष्ट सर्वांसमोर उघड केली. आपण शाळेत असतेवेळी शिक्षिकांसोबत फ्लर्ट करायचो, असं तो म्हणाला. ‘एखाद्या शिक्षिकेसाठी कोणाच्या हृदयाचा ठोका चुकला नाही असं होणं निव्वळ अशक्यच आहे. मुख्य म्हणजे अनेकजण ही गोष्ट लपवून ठेवतात. पण, मी मात्र तसं करत नाहीये. मी खुलेपणाने सांगतो की, हो; मी शिक्षिकांसोबत खूपच फ्लर्ट करायचो’, असं सलमान म्हणाला.

वाचा : मानधन न स्विकारताही आमिर असा कमावतो बक्कळ नफा

सलमानच्या या वक्तव्यानंतर त्याने खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा सर्वांचच लक्ष वेधलं. आता त्याच्या शिक्षिकांपर्यंत ही खोडी पोहोचली आहे की नाही ही बाबही तितकीच महत्त्वाची आहे. दरम्यान, सोशल मीडियापासून ते कलाविश्वापर्यंत चर्चेत असणारा हा भाईजान सध्या ‘भारत’ या चित्रपटामध्ये व्यग्र आहे. त्याशिवाय येत्या काळात तो ‘बिग बॉस’च्या नव्या पर्वातूनही छोट्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.