रुपेरी पडद्यावर प्रेमकथा अत्यंत प्रभावीपणे मांडणारा दिग्दर्शक म्हणून इम्तियाज अली ओळखला जातो. ‘जब वी मेट’, ‘रॉकस्टार’, ‘हायवे’ असे दमदार चित्रपट त्यांनी प्रेक्षकांच्या भेटीला आणले. आता आगामी ‘लैला- मजनू’ या चित्रपटाच्या निमित्ताने तो कोरिओग्राफीत पदार्पण करत आहे.

इम्तियाज अलीचा भाऊ साजिद अलीने ‘लैला मजनू’ चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर दिग्दर्शक म्हणून साजिदचा हा पहिलाच चित्रपट आहे. याची पटकथा इम्तियाजने लिहिली असून ‘सरफिरी’ या गाण्याची कोरिओग्राफी त्याने केली आहे.

कोरिओग्राफी क्षेत्रात पदार्पण करण्याबद्दल इम्तियाज मजेशीरपणे म्हणतो की, ‘आता जर माझे बरेच मित्र कोरिओग्राफर होऊन मला घाबरवत आहेत. तर मीसुद्धा विचार केला आहे की कोरिओग्राफी करत त्यांना धक्का देतो.’ गाण्यांच्या सिनेमॅटोग्राफीबद्दल सुरुवातीपासूनच आवड असल्याचंगी त्याने सांगितलं.

वाचा : निर्मात्याने केली होती शरीरसुखाची मागणी; ‘सैराट’ रिमेकमधील अभिनेत्रीचा खुलासा

‘लैला मजनू’ या चित्रपटात तृप्ती डिमरी आणि अविनाश तिवारी हे नवोदित कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. यातलं श्रेया घोषालच्या आवाजातील ‘सरफिरी’ हे गाणं काश्मीरमध्ये चित्रीत करण्यात आलं आहे. ७ सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.