हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये नकारात्मक भूमिका साकारणारा अभिनेता सोनू सूद मागील अनेक महिन्यांपासून रियल लाइफ हिरो ठरत आहे. मागील वर्षीच्या लॉकडाउनच्या कालावधीमध्ये स्थलांतरितांसाठी केलेलं मदत कार्य असो किंवा अन्नदान असो सोनूने लाखो लोकांना सुखरुप घरी पोहचण्यासाठी मदत केली. आता ऑक्सिजन, बेड्स आणि रेमडेसिविरसारख्या गोष्टींचा तुटवडा जाणवत असतानाही सोनू त्यांच्या सोनू सूद फाऊंडेशनच्या मदतीने लोकांना थेट त्यांच्यापर्यंत मदत पोहचवतो आहे. विशेष म्हणजे सरकारी स्तरावर ज्या गोष्टी उपलब्ध करुन देण्यास वेळ लागतोय त्या गोष्टी सोनू अवघ्या काही तासांमध्ये गरजूंपर्यंत पोहचवतोय. त्यामुळेच त्याच्याकडे मदतीची मागणी करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. त्याच्याकडे मदत मागणाऱ्यांसंदर्भातील अंदाज येणारी आकडेवारी नुकतीच सोनूने ट्विट केली आणि मी प्रत्येक तासाला एकाला मदत करायचं ठरवलं तरी २०३५ उजाडेल असं सोनूने या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

सोनूने शनिवारी त्याच्याकडे मदतीसाठी ४१ हजार ६६० जणांनी मागणी केल्याचं ट्विटरवरुन सांगितलं. “काल माझ्याकडे ४१ हजार ६६० जणांनी मदत मागितली. आम्ही सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी पर्यत्न करत आहोत. पण ते शक्य दिसत नाहीय. मी प्रत्येकापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला तर मला यासाठी १४ वर्षांचा कालावधी लागेल. म्हणजेच सर्वांपर्यंत पोहण्याचा मी प्रयत्न केला तर त्यासाठी २०३५ साल उजाडेल,” असं सोनूने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वीच भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनालाही सोनूने मदत केली होती. सुरेश रैनाने ट्विटरवर त्याच्या नातेवाईकासाठी ऑक्सिजन सिलेंडर तातडीने हवा असल्याचं म्हटलं होतं. त्यावर सोनूने रिप्लाय देऊन आवश्यक ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आल्याचं सांगितलं होतं. भारावलेल्या रैनाने सोनूचे मनापासून धन्यवाद मानले होते. सोनू करत असलेल्या कामाचं सर्वच स्तरामधून कौतुक होताना दिसत आहे. बॉलिवूड कलाकारांपासून क्रिकेटपटूंपर्यंत आणि इतर श्रेत्रातील मान्यवरांनाही सोनूच्या या कामाचं तौंड भरुन कौतुक केलं आहे.