आयकर विभागाच्या अधिका-यांनी सुपरहिट ठरलेला चित्रपट बाहुबलीच्या निर्मात्यांच्या संबंधित कार्यालयांची झडती घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही झडती आयकर विभागाच्या नियमित प्रक्रियेच्या अंतर्गत घेण्यात आली होती. ही झडती बंजारा हिल्स आणि जुबली हिल्स येथील कार्यालयात घेण्यात आली.

प्रभास, तमन्ना आणि राणा डग्गुबती यांच्या प्रमुख भूमिका असलेला चित्रपट गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात जगभरात जवळपास ४००० स्क्रिन्सवर तेलुगू, तमिल, हिंदी आणि मलयाळम भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता. एम एस राजमौली दिग्दर्शित शोबू यारलगाडा, प्रसाद देवीनेनी आणि धर्मा प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाने जवळपास ५०० कोटी रुपयांपेक्षाही अधिक कमाई केली होती.

दरम्यान, लवकरच बाहुबली २ हा चित्रपट येणार आहे. या चित्रपटाचा पहिला पोस्टर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आला होता. १८ व्या ‘मुंबई चित्रपट महोत्सवा’मध्ये आणि सिनेमाचा मुख्य अभिनेता प्रभासच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. सिनेमाचे पोस्टर फार दमदार होते. या पोस्टरमध्ये प्रभास एका हातात जड साखळी तर दुसऱ्या हातात तलवार घेऊन उभा असलेला दिसला. त्याच्या नजरेत राग आणि दुःख दोन्ही दिसत होते. गळ्यात लॉकेट आणि शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झालेल्या त्यात दिसल्या. व्यक्तिमत्वाबद्दल बोलायचे झाले तर बाहुबलीच्या दुसऱ्या भागात प्रभास पहिल्यापेक्षा अधिक तंदुरुस्त दिसत होता. या पोस्टरमध्ये प्रभासच्या मागे पहिल्या भागातल्या बाहुबलीची छबी आकाशात चमकणाऱ्या वीजेसोबत दिसली.

या सिनेमाच्या क्लायमॅक्सचे शूटिंग हैदराबादमध्ये केले गेले आहे. सांगण्यात येत आहे की, या सिनेमाचे संपूर्ण शूटिंग नोव्हेंबरमध्ये पूर्ण होईल आणि या सिनेमाच्या प्रदर्शनासाठी प्रेक्षकांना फार काळ वाट पाहावी लागणार नाही. सिनेमाच्या पहिल्या भागाचा ट्रेलर अनेकांना आवडला होता. त्यामुळे या दुसऱ्या भागाचा ट्रेलरही अनेकांना आवडेल अशी अपेक्षा केली जात आहे. बाहुबली सिनेमाने फक्त भारतातच नाही तर विदेशातही आपल्या नावाचा बोलबाला गाजवला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अनेक सिनेमांचे रेकॉर्ड मोडले होते. कला दिग्दर्शक साबू सायरिल यांनी ‘बाहुबली २’ साठी नवीन साम्राज्य उभं केलं आहे. ‘बाहुबली २’ साठी बनलेल्या या नवीन साम्राज्यचे फोटोही काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आले होते. ‘बाहुबली २’ चा हा सेट बनवण्यासाठी सुमारे ३०० ते ५०० कामगार वापरण्यात आले होते.