आयकर विभागाचे अधिकारी आज पुन्हा बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या मुंबईतल्या घरी पोहोचले आहेत. यापूर्वी बुधवारी,सोनू सुद संबंधित ६ मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. ज्यात त्याच्या धर्मादाय कार्यालयाचा समावेश आहे. माध्यमांच्या माहितीनुसार, आयकर विभागाचे पथक सोनू सूदच्या लखनऊमधील एका रिअल इस्टेट कंपनीशी केलेल्या कराराची चौकशी करत आहे. मात्र, आतापर्यंत या प्रकरणावर कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही.

करोना काळात टाळेबंदीमध्ये गरजू लोकांना आर्थिक मदत करणारा, त्यांना त्यांच्या घरी जाण्यासाठी सहकार्य करणारा अभिनेता सोनू सूदच्या मालमत्तेची पाहणी प्राप्तिकर विभागाने सुरू केली आहे. बुधवारी सोनू सूदच्या कार्यालयासह त्याच्याशी संबंधित सहा कंपन्यांची प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. सोनू सूदच्या कार्यालयात आर्थिक देवाणघेवाणीत अफरातफर झाल्याचे समजल्यामुळे ही पाहणी केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली होती.

एनडीटीव्हीने सोनू सूदच्या बाबतीत चालू असलेल्या आयकर विभागाच्या तपासावर दिलेल्या अहवालानुसार, सोनू सूद आणि लखनऊ बेस्ट रिअल इस्टेट फर्म यांच्यात झालेला कराराबाबत आयकर विभाग तपास करत आहे. या करारात करचुकवेगिरीच्या आरोपानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या तपासाला ‘सर्वे’ म्हटले जात आहे. याशिवाय, सोनू सूदबाबत सुरु असलेल्या तपासाला राजकीय रंगही दिला जात आहे. अलीकडे सोनू सूद दिल्ली सरकारच्या एका प्रकल्पाचा ब्रँड अॅम्बेसेडर बनला आहे.

दरम्यान, बुधवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास प्राप्तिकर विभागाचे अधिकारी सोनू सूदच्या कार्यालयात पोहोचले होते.  त्याच्या कार्यालयातील कोणतीही कागदपत्रे वा अन्य गोष्टी अधिकाऱ्यांकडून जप्त करण्यात आलेल्या नाहीत. सोनू सूदशी संबंधित अन्य सहा कंपन्यांचीही विभागाकडून पाहणी करण्यात आली आहे. सोनू सूदवर सुरू झालेली आयकर विभागाची कारवाई ही राजकीय सूडबुध्दीने केली जात असल्याची चर्चा मात्र समाजमाध्यमांवर सुरू झाली आहे.