‘बेवॉच’ चित्रपट, ‘क्वान्टिको’ मालिका आणि काही सोहळे या निमित्ताने सध्या सतत मी विदेशातच असते. त्यामुळे हिंदी चित्रपटाच्या काही चांगल्या ऑफर असल्या तरी इतक्यात हिंदी चित्रपट मी स्वीकारू शकत नाही, असे प्रियांका चोप्रा सांगत होती. ‘मॅक्झीम हॉट 100’ च्या निमित्ताने पत्रकारांशी संवाद साधताना प्रियांका बोलत होती. बरेच दिवस आपण बॉलिवूडच्या चित्रपटातून भूमिका न केल्याने चित्रपट रसिक आपल्याला विसरतील, अशी आपल्याला भीती वाटत नाही. त्यांच्या समोर राहण्यासाठी उगाचच कोणता तरी सामान्य चित्रपट स्वीकारणे मला मान्य नाही. आपल्या चित्रपट रसिकाना चांगले काय नि वाईट काय हे समजते, असेही ती म्हणाली. दीपिका पदुकोण आणि तिची टीम हॉलीवूडचे चित्रपट मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. याबाबत त्यानाच काय ते विचारावे. त्याचे उत्तर मी कसे देणार, असेही ती म्हणाली. मी हॉलीवूडच्या चित्रपटातून भूमिका साकारताना आपले अस्तित्व व महत्व वाढावे, याचा प्रयत्न करतेच. पण मला वाटते हिंदीसह आपल्या संपूर्ण देशातील चित्रपटसृष्टीला हॉलीवूडचे चित्रपट मिळावेत. अर्थात हे सोपे नाही. मी दिवस रात्र मेहनत केली. खाण्यावर ताबा मिळवला. अगदी डाळ भात खाऊन राहिले तेव्हा मला हे स्थान प्राप्त झाले. आता ते चांगले काम करून टिकवायचे असल्याची भावना तिने व्यक्त केली. ४० दिवसांसाठी आपण मुंबईत आलो होतो ते दिवस संपत आल्याचे तिने सांगितले.