‘इन्स्टाग्राम’वरील श्रीमंतांची यादी म्हणजे काय, असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. तर इन्स्टाग्राम अकाऊंटवर एखाद्या सेलिब्रिटीचे फॉलोअर्स किती आहेत आणि एखाद्या प्रमोशनल पोस्टसाठी ती सेलिब्रिटी किती पैसे आकारते यावरून ही यादी ठरवली जाते. या यादीत बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंतचा यशस्वी प्रवास करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राने स्थान मिळवलं आहेत. विशेष म्हणजे या यादीत स्थान मिळवणारी ही एकमेव भारतीय अभिनेत्री आहे.
HopperHQ.comद्वारे जारी करण्यात आलेल्या इन्स्टाग्राम श्रीमंतांच्या यादीत प्रियांका १९व्या स्थानावर आहे. तिने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यालाही मागे टाकलं आहे. विराट या यादीत २३व्या स्थानावर आहे. या यादीत स्थान मिळवणारे फक्त हे दोघंच भारतीय आहेत.
‘देसी गर्ल’ प्रियांकाचे इन्स्टाग्रामवर ४३.३ मिलियन म्हणजे जवळपास ४ कोटी ३० लाख इतके फॉलोअर्स आहेत. एखादा प्रमोशनल पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यासाठी ती १ कोटी ८६ लाख रुपये घेते. तर विराटचे इन्स्टाग्रामवर ३८.२ मिलियन म्हणजे ३ कोटी ८० लाख फॉलोअर्स आहेत. विराट एका प्रमोशनल पोस्टसाठी १ कोटी ३५ लाख रुपये घेतो.
या यादीत पहिल्या स्थानावर अमेरिकेतील रिअॅलिटी टीव्ही स्टार आणि मॉडेल काइली जेनर आहे. काइलीचे इन्स्टाग्रामवर तब्बल १४१ मिलियन फॉलोअर्स आहेत आणि एका प्रमोशनल पोस्टसाठी ती तब्बल ८ कोटी ७० लाख रुपये घेते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 26, 2019 9:43 am