अभिनयाच्या ताकदीवर गेली अडीच-तीन दशके सामान्यांतील असामान्य व्यक्तिरेखांमध्ये प्राण ओतणारा इरफान खान याचं निधन होऊन एक महिना उलटला. मात्र आजही त्याचे कुटुंबीय आणि चाहते त्याच्या आठवणीत रमतात. इरफानच्या निधनानंतर त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टी सध्या समोर येत आहेत. यामध्येच त्याची एक आठवण त्याच्या मित्राने सांगितली आहे. विशेष म्हणजे मृत्यूशी झुंज देण्यापूर्वी इरफानने करोनाग्रस्तांसाठी मदत केली होती.

‘पिंकव्हिला’नुसार, करोनामुळे देशावर ओढावलेल्या संकटात हातावर पोट असणाऱ्यांचे आणि करोनाची लागण झालेल्या व्यक्तींना अनेक संकटाचा सामना करावा लागत होता. त्यामुळे या नागरिकांना संकटप्रसंगी मदत करण्यासाठी इरफानने अन्नधान्य पुरविलं होतं.

“करोना विषाणूमुळे देशात निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि गरजुंची भूक भागविण्यासाठी मी आणि माझी टीम फंड गोळा करत होतो. या काळात इरफान खान यांच्या भावाशी माझं बोलणं झालं होते. ते आम्हाला आर्थिक मदत करायला तयार झाले होते. विशेष म्हणजे त्याच वेळी इरफान खान यांनीदेखील आम्हाला मदत केली. मात्र ही मदत करण्यापूर्वी त्यांनी ही गोष्ट कोणालाही सांगायची नाही,अशी अट ठेवली होती”, असं इरफान खानचा मित्र जिआउल्लाह यांनी सांगितली.

पुढे ते म्हणतात, “जर तुम्ही कोणाला मदत करत असला, दान करत असाल तर ते कायम गुप्त राहिलं पाहिजे. त्याची कोणाला माहिती नसावी, असं इरफानचं मत होतं.त्यामुळे त्यांनी ही गोष्ट लपवून ठेवली. आज इरफान आपल्यात नाहीत, त्यामुळे त्यांनी निधनापूर्वी कोणती चांगली केली हे सगळ्यांना सांगायची गरज आहे. जर ते आज आपल्यात असते”, तर मी कधीच ही गोष्ट सांगितली नसती.

दरम्यान, २९ एप्रिल रोजी इरफानने जगाचा निरोप घेतला. colon infection मुळे त्याला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र बुधवारी सकाळी त्याने अखेरचा श्वास घेतला. प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर कॅन्सरवर मात केल्यानंतर तो भारतात परतला होता.