बॉलिवूडचा प्रतिभावंत कलाकार इरफान खान यांचं निधन होऊन आता महिना उलटला आहे. मात्र त्यांच्या आठवणी आजही त्याच्या कुटुंबीयांना स्वस्थ बसू देत नाहीत. प्रत्येक क्षणाला इरफानच्या आठवणी त्यांच्या पत्नीला आणि मुलांना येत असून बऱ्याच वेळा ते चाहत्यांसोबत या आठवणी शेअर करत असतात. त्यामध्येच पहिल्या पावसाच्या सरी कोसळ्यानंतर इरफानची पत्नी सुतापाला इरफानची आठवण आली असून तिने एक खास फोटो शेअर केला आहे.

इरफान खानचा मुलगा बाबिल कायमच इरफानचे वेगवेगळे फोटो शेअर करुन त्याच्या आठवणींना उजाळा देत असतो. त्यातच आता इरफानच्या पत्नीने एक फोटो शेअर केला आहे. यात इरफानने २०१६ मध्ये लावलेली काही झाडे दिसून येत आहेत.


आज किती सुंदर भेटवस्तू मिळाली आहे. तू गेल्यानंतरही ते असेच बहरतील. झाडं लावली, असं कॅप्शन देत सुतापाने काही झाडांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ही झाडं इरफानने २०१६ मध्ये लावली होती. आता ती झाडं मोठी झाल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, यापूर्वीदेखील सुतापाने इरफानसाठी अशीच एक पोस्ट शेअर केली होती. इरफान खानने २९ एप्रिल रोजी जगाचा निरोप घेतला. त्याच्या अचानक झालेल्या एक्झिटमुळे कुटुंबीयांसोबतच चाहत्यांसाठी हा फार मोठा धक्का सहन करावा लागला होता.