टेलिव्हिजनवरील ‘रिअ‍ॅलिटी शो’च्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेला कोरिओग्राफर रेमो डिसूझा याने नृत्यावरील पहिला थ्रीडी चित्रपट दिग्दर्शित केला. ‘एबीसीडी’ आणि ‘एबीसीडी २’ या दोन्ही चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळालं. त्यानंतर रेमोने ‘एबीसीडी ३’ या चित्रपटाची घोषणा केली. यामध्ये अभिनेता वरुण धवन मुख्य भूमिकेत झळकणार असल्याची घोषणा त्याने एका रिअॅलिटी शोदरम्यान केली होती. ‘एबीसीडी २’मध्येही वरुण मुख्य भूमिकेत होता. पण आता सीरिजच्या या तिसऱ्या चित्रपटासाठी वरुणने घसघशीत मानधन घेतल्याचं कळतंय.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार रेमो डिसूझा दिग्दर्शित या चित्रपटासाठी वरुण तब्बल २१ कोटी रुपये मानधन घेत आहे. हा चित्रपट 4D मध्ये शूट होणार असल्याचं समजतंय. असं झाल्यास 4D मध्ये शूट होणारा हा पहिला बॉलिवूड चित्रपट ठरेल.

वाचा : ‘नवरा असावा तर असा’ कार्यक्रमाचे ३०० भाग पूर्ण; सेटवर जंगी सेलिब्रेशन

वरुणसोबत यामध्ये कतरिना कैफ झळकणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने वरुण आणि कतरिना पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहेत. त्यासोबतच धर्मेश, राघव आणि पुनितसुद्धा भूमिका साकारणार असल्याची माहिती सूत्रांची दिली आहे.

रेमोच्या ‘एबीसी़डी’ सीरीजमुळे बॉलिवूडमध्ये डान्सवर आधारित चित्रपटांचं महत्त्व वाढलं. वरुणचं डान्सवरील प्रेमही सर्वश्रुत आहे. त्यामुळे पडद्यावर रेमो आणि वरुण ही जोडी पुन्हा एकदा काय कमाल करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.