गेल्या आठवडाभरापासून फरार असलेल्या अभिनेता अरमान कोहलीला मंगळवारी पोलिसांनी अटक केली. बुधवारी त्याला कोर्टात हजर केले असता २६ जूनपर्यंत त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. गर्लफ्रेंड निरू रंधावाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र अखेर निरूने तिची तक्रार मागे घेतली आहे. त्यामुळे अरमानची कोठडीतून सुटका होण्याची शक्यता आहे. पण अचानक निरुने ही तक्रार का मागे घेतली असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

‘स्पॉटबॉय ई’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली की, ‘अरमान हा लोकांना पराकोटीचा त्रास देण्याऱ्या व्यक्तींपैकी आहे आणि त्याच्या या राक्षसी रुपाची मला खूपच भीती वाटते.’ व्यवसायाने फॅशन स्टायलिस्ट असलेली निरू २०१५ पासून अरमानसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे.

अरमानच्या छळाला वैतागलेल्या निरुने याव्यतिरिक्त निरुने तक्रार मागे घेण्यामागचं आणखी एक कारण सांगितलं. ‘माझ्याकडे ब्रिटीश पासपोर्ट आहे. त्यामुळे मी भारतात फार काळ राहणार नसून युकेला जाणार आहे. जर मी तक्रार मागे घेतली नसती तर मला सतत मुंबईला यावं लागलं असतं. अरमानसारख्या व्यक्तीसाठी मी हा मनस्ताप करून घेणार नाहीये. एक वाईट स्वप्न होतं असं समजून हे सगळं विसरण्यातच माझं भलं आहे,’ असं स्पष्टीकरण तिने दिलं.

एका क्षुल्लक कारणावरून अरमान आणि निरूमध्ये ३ जून रोजी भांडण झालं आणि राग अनावर न झाल्याने अरमानने तिला बेदम मारहाण केली. त्यातच जिन्यावरून पडल्याने निरुला दुखापत झाली आणि कोकिलाबेन रुग्णालयात तिला उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. या घटनेनंतर निरुने तक्रार दाखल केली आणि तेव्हापासूनच अरमान बेपत्ता होता. अखेर एक आठवड्यानंतर लोणावळा इथून त्याला त्याच्या मित्राच्या फार्म हाऊसवरून अटक करण्यात आली.