बॉलिवूडमधली मराठमोळी अभिनेत्री ईशा कोप्पीकर भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत षण्मुखानंद सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात ईशा भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बॉलिवूडमधील कलाकारांना पक्षात घेऊन प्रचारात स्टार कॅम्पेनेर म्हणून वापरण्यावर भाजपचा भर असणार आहे.
षण्मुखानंद सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात पक्षाच्या देशव्यापी वाहतूक संघटनेची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाच्या दरम्यान ईशा अधिकृतपणे भाजपात प्रवेश करेल. पक्षामध्ये प्रवेश करताच ईशाकडे भाजपाच्या वाहतूक संघटनेतील देशपातळीवरची मोठी जबाबदारी देण्याची शक्यता आहे.

या कार्यक्रमाला नितीन गडकरी यांच्यासह राज्यातील भाजपाचे दिग्गज नेते उपस्थित राहतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. ईशा कोप्पिकरने आतापर्यंत बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहे. ईशा कोप्पिकरचा स्वत:चा असा वेगळा चाहतावर्ग आहे. याचा फायदा भाजपाला आगामी निवडणुकीत होण्याची शक्यता आहे.

ईशाने आतापर्यंत अनेक हिंदी, मराठी, तामिळ, तेलुगू, कन्नड भाषि चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘रब ने बना दी जोडी’, ‘एक विवाह ऐसा भी’, ‘राईट या राँग’,’मैंने प्यार क्यों किया’, ‘डरना जरुरी है’, ‘क्या कूल है हम’, ‘हम तुम’ यासारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये ईशाने अभिनय केला आहे.