|| निलेश अडसूळ

अभिनय क्षेत्रात करिअर करत असताना हिंदीमध्ये काम मिळवणे कठीण आहे असा प्रत्येकाचा समज आहे. परंतु हा समज खोडून नवा विचार देण्याचे काम अभिनेत्री अमृता खानविलकर हिने केले आहे. ‘हिंदीमध्ये काम मिळवणे सहज नसले तरी अवघडही नाही. तुमच्यामध्ये ती धमक असेल तर काम मिळतेच. त्यासाठी हिंदीमध्ये कास्टिंग डिरेक्टर, कास्टिंग एजन्सी अशा यंत्रणा उत्तमरित्या कार्यरत आहेत. आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचता यायला हवे’, अशा शब्दांत अमृताने कास्टिंग एजन्सीचे अभिनय क्षेत्रातील महत्त्व विशद के ले आहे.

मराठीत कास्टिंग डिरेक्टर या संकल्पनेचा अभाव जाणवतो. मराठीत इतके कसदार कलाकार असतानाही त्यांना काम मिळत नाही, कारण चांगल्या नवनवीन कलाकारांचा शोध घेऊन त्यांना योग्य त्या दिग्दर्शक-निर्मात्यांपर्यंत पोहोचवणारी  संदर्भात काम करणारी कोणतीही यंत्रणा इथे नाही. तरुण मंडळींना कामासाठी कुठे जावे, कुणाकडे संधी आहे हे कळत नाही. याच गोष्टीत सुसूत्रता आणण्याचे काम कास्टिंग डिरेक्टर आणि एजन्सी करत असतात. क ोणत्या कलाकाराकडे काय कसब आहे आणि निर्मात्याला- दिग्दर्शकाला कशाची गरज आहे हे अचूक हेरून या संस्था काम देत असतात, असेही ती सांगते.

अभिनेता पुष्कर जोग आणि अमृता खानविलकर यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘वेल डन बेबी’ हा चित्रपट येत्या ९ एप्रिलला ‘अ‍ॅमेझॉन प्राईम’वर प्रदर्शित होत आहे. त्या निमित्ताने अमृता आणि पुष्कर या दोघांनीही मनोरंजन क्षेत्रातील विविध विषयांवर आपली मतं मांडली. एकीकडे अमृताने कास्टिंग एजन्सीचे महत्व सांगितले तर दुसरीकडे पुष्करने सध्या चांगल्या मालिकांमधून मिळालेली संधीही कलाकारासाठी पर्वणी ठरत असल्याचे मत व्यक्त के ले. कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस’ या कार्यक्रमाने त्याला ओळख आणि प्रसिध्दी मिळवून दिली. ‘चित्रपट हे मोठे माध्यम असले तरी मालिका या घराघरात पाहिल्या जातात. मधल्या काळात माझे काम बरेच थांबले होते. त्याला चालना देण्याचे काम मालिका क्षेत्राने केले. ‘बिग बॉस’ मधून वेगळा पुष्कर लोकांनी पाहिला. त्यातून नव्या संधी, नवे चित्रपट मिळत गेले. मनोरंजन क्षेत्रात कायम उगवत्या सूर्याला नमस्कार केला जातो. त्यामुळे माझे गेलेले वैभव मला या ‘बिग बॉस’ मधून परत मिळाले’, असे पुष्कर मनमोकळेपणाने सांगतो.

विशेष म्हणजे अमृता आणि पुष्कर दोघांनाही मराठीबरोबरच हिंदीतही आपली छाप उमटवली आहे. नवोदित कलाकारांनाही हिंदीत काम करणे अवघड नाही असे ते सांगतात. ‘हिंदीमध्ये भाषा सोडून काहीच  बदल नाही. मुळात अभिनय करताना भाषेचे बंधन बाळगू नये. आपण आपले शंभर टक्के  दिले तर हिंदीतही आपल्या कामाची दखल घेतली जाते. प्रामाणिकपणा ढळता कामा नये. तिथे काम करण्याचा अनुभव प्रत्यकाने घ्यावा. हिंदीचा आवाका राष्ट्रीय स्तरावर असल्याने व्यापक प्रेक्षकवर्ग मिळतो’, हा मुद्दा दोघांनीही आग्रहाने मांडला.

‘वेल डन बेबी’ या चित्रपटाचे चित्रीकरण जरी टाळेबंदीपूर्वी झाले असले तरी विविध कलाकृतींच्या माध्यमातून करोनाकाळात चित्रीकरणाचा अनुभव अमृताने घेतला आहे. ‘नवसामान्य जीवनाचा अनुभव आपण प्रत्येकजण घेत आहोत. काही लोकांना त्याच्याशी चटकन जुळवून घेता आले तर काही लोक प्रयत्न करत आहेत. पण आपण बाहेर पडून सर्व काळजी घेऊन काम करतो आहोत ही बाब माझ्यासाठी महत्वाची आहे. कारण उपजीविकेसाठी कष्ट करणे ही माणसाची मुलभूत गरज आहे जी थांबता कामा नये.  सर्व चित्रीकरण स्थळी जास्तीत जास्त उपाययोजना करून चित्रीकरण केले जात आहे’, असेही तिने सांगितले. पुष्करने देखील डेहराडून येथे नुकत्याच एका चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. ‘मास्क घालून वावरणे, एकमेकांपासून अंतर राखणे हा अनुभव वेगळा होता, पण काम करतोय याचे समाधान अधिक होते. त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक तंत्रज्ञ गेली काही महिने काम थांबल्याने उपासमार भोगत होते. या निमित्ताने त्यांना काम मिळाले,’ असे त्याने सांगितले.

चित्रपटाविषयी..

आजच्या काळात बदलणारे नाते आणि त्या नात्यांचा तरुणाईच्या अंगाने घेतलेला वेध म्हणजे ‘वेल डन बेबी.’ अमृता खानविलकर, पुष्कर जोग यांच्या प्रमुख भूमिकांसह ज्येष्ठ अभिनेत्री बंदना गुप्ते यांच्या खुमासदार अभिनयाची फोडणी असलेला हा चित्रपट येत्या ९ एप्रिलला ‘अमेझॉन प्राईम’वर प्रदर्शित होत आहे.

‘हा नात्यांवर भाष्य करणारा चित्रपट आहे. त्यातही आजच्या तरुणाईच्या नात्याबाबतच्या संकल्पना या चित्रपटात दिसतील. नाते सांभाळताना येणारी आव्हाने, हळवेपण, पालकत्व याचा धांडोळा यात घेण्यात आला आहे. चित्रपटातली नायिका गर्भवती आहे. लग्नानंतर दोघांच्या नात्यात काहीएक अंतर आहे आणि त्याचवेळी आलेलं गर्भारपण अनुभवताना त्या नऊ महिन्यात त्या दोघांच्या नात्यात काय बदल होतात, काय चढउतार येतात त्याची ही गोष्ट आहे. केवळ दोघांची नाही तर ही तिघांची गोष्ट आहे. त्याची सासू म्हणजे नायिकेची आईही या कथेतला महत्वाचा भाग आहे’, असे पुष्करने सांगितले. ‘एखादी स्त्री गर्भवती झाल्यानंतर कायमच तिच्या अंगाने, तिच्या सोयीचा, काळजीचा विचार केला जातो. परंतु त्या मुलाच्या बापाची अवस्था, त्याची मानसिकता, जबाबदारी कुणीही समजून घेत नाही. त्यामुळे या काळात पुरुषांना काय वाटते याचाही विचार चित्रपटातून मांडला आहे,’ असेही तो म्हणाला.

‘नायिके ला दिवस गेले असले तरी या काळात स्त्रीने काही त्यागाची भूमिका घ्यावी असे तिला वाटत नसते. काम हे तिच्यासाठी सर्वस्व आहे. तिच्या आईचा तिच्यावर प्रचंड प्रभाव असतो. विशेष म्हणजे नवरा-बायकोचे नाते संपुष्टात आलेले असताना तिला दिवस जातात आणि मग कथा सुरु होते. त्यामुळे वेगळा विचार करायला लावणारा हा चित्रपट आहे’, असे अमृता तिच्या भूमिकेविषयी सांगते. यासोबतच आईची म्हणजे वंदना गुप्ते यांची भूमिकाही यात तितकीच महत्वाची आहे. त्यांचे विचार, त्यांची भूमिका, मागच्या पिढीचे नेतृत्व, मार्गदर्शन याची भक्कम साथ देणारे हे पात्र आहे, असेही अमृताने सांगितले.